पुणे : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) तीन महिन्यात पुणे विभागातून १८४ जणांना अटक केली आहे. प्रशासनाने जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्याची आकडेवारी जाहीर केली आहे. राज्यातील सात विभागांत कोकणखालोखाल पुणे विभागांतील अटकेतील आरोपींची संख्या दुसऱ्या क्रमांकावर आहे.
तुकाराम मुंढे यांनी मे २०२६ मध्ये ‘एफडीए’ची सूत्रे हाती घेतल्यानंतर तीन महिन्यांतील कारवाईची स्थिती प्रशासनाने जाहीर केली. पुणे विभागात सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या चार जिल्ह्यांचा समावेश होतो.
या तीन महिन्यांत राज्यात माहिती अहवाल पुणे विभागात प्रथम नोंदवले गेले. नियमभंग करणाऱ्यांविरोधात केवळ प्रशासकीय कारवाई न करता फौजदारी कारवाईवरही भर देण्यात आला आहे. तीन महिन्यांत विविध प्रकरणांमध्ये १४४ ऍएफआयआर दाखल करण्यात आले असून, १८४ जणांना अटक करण्यात आली आहे.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, जून ते ऑगस्ट या तीन महिन्यांत विभागातील ४ हजार २६१ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन, स्वच्छतेचा अभाव, परवाना आणि इतर नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये १ हजार ३२१ आस्थापनांना सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. गंभीर स्वरुपाच्या त्रुटी किंवा नियमभंग आढळलेल्या १६८ आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले. तसेच, विविध कारवायांमध्ये मोठ्या प्रमाणात अन्नसाठा जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या साठ्याची एकूण किंमत ११ कोटी ४४ लाख रुपये आहे.
आधुनिक तक्रार निवारण प्रणाली
नागरिकांसाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तक्रार निवारण प्रणाली सुरू केली आहे. नागरिक https://complaints.mahafda.in या पोर्टलवर किंवा १८००२२२३६५ या टोल-फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवू शकतात.
