पुणे : सणासुदीच्या काळात अन्नपदार्थांच्या दर्जाची तपासणी करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पुणे विभागात विशेष मोहीम राबवली. या मोहिमेत २८ ते ३१ ऑक्टोबर या चार दिवसांत २९ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. या कारवाईत ६६ हजार ७०९ किलो अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. जप्त साठ्याची किंमत एक कोटी ४७ लाख १२ हजार ६७० रुपये आहे.

खाद्यतेले, तांदूळ, डाळी, गूळ, दुग्धजन्य पदार्थ, मिठाई, नमकीन आणि सुकामेवा अशा विविध अन्नपदार्थांचा यात समावेश आहे. या मोहिमेत एका अन्न व्यावसायिकाचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. अशी माहिती ‘एफडीए’ने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

पुणे मार्केट यार्ड परिसरातील अन्नपदार्थांच्या साठ्याची तपासणी करण्यात आली. मे. श्रीकांत मसालेवाले, मे. भन्साळी मेहता पेढी, मे. नकुल एंटरप्रायझेस, मे. महाराष्ट्र सेल्स, मे. ध्रुवी ॲग्रो आणि मे. गणेश रामचंद्र आपटे प्रा. लि. या आस्थापनांविरोधात कारवाई करण्यात आली.

साताऱ्यातून २० हजार किलो अन्नपदार्थ जप्त

‘एफडीए’ने २८ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत राबविलेल्या विशेष मोहिमेत सातारा येथील मे. अमीन ट्रेडर्समधून २० हजार ५६० किलो तांदूळ, डाळी, गूळ आणि इतर अन्नपदार्थ जप्त करण्यात आले. त्याचबरोबर साताऱ्यातील मे. स्वाती ऑईल मिल्समधून ६ हजार ६७१.३० किलो खाद्यतेल जप्त करण्यात आले. सोलापूर येथील मे. एस. जी. ट्रेडर्समधून ६ हजार २३५ किलो खाद्यतेलाचा साठा जप्त करण्यात आला. अन्न व औषध प्रशासनाने भेसळखोरांच्या विरोधात मोहीम उघडली असून त्या पार्श्वभूमीवर राज्यातील सातही विभागात कारवाया सुरू आहेत. याविषयी भेसळ आढळल्यास नागरिकांनी तक्रार नोंदवावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.