पुणे : अन्न व औषध प्रशासनाने पुणे जिल्ह्यासह सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यात भेसळीच्या संशयावरून मंगळवारी १४ ठिकाणी छापे टाकून ३१ लाख ७३ हजारांचे अन्नपदार्थ जप्त केले आणि गुन्हे दाखल केले. यामध्ये पान, गुटखा, दुग्धजन्य पदार्थ, सोयाबीन, कडधान्य आदी माल जप्त करण्यात आला आहे.

पुणे विभागात १४ आस्थापनांची तपासणी करून प्रतिबंधित अन्नपदार्थ साठा जप्त करून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनामार्फत ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या, बेकायदा प्रतिबंधित अन्न उत्पादन साठवणूक व वितरण तसेच विक्री करणाऱ्या आस्थापनांविरुद्ध अशा मोहिमा भविष्यातही सुरू राहणार असून नागरिकांनी अशा बाबींची माहिती प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक १८००२२२३६५ यावर संपर्क साधण्याचे आवाहन सहआयुक्त (अन्न) वि. दा. भोगावडे यांनी केले आहे.
भेसळयुक्त अन्नपदार्थ, सुपारी जप्त

जुन्नर : आंबेगाव, खेड तालुक्यात अन्न व औषध प्रशासनाने पाच ठिकाणी छापे टाकून गुटखा, भेसळयुक्त सुपारी, मैदा, बेसन, वाटाणा असा सुमारे १९ लाख रुपयांचा साठा जप्त केला.

आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे एका गोदामावर कारवाई करून गुटखा, पानमसाला जप्त करण्यात आला. मंचर येथे एका दुकानातील भेसळयुक्त मैदा, बेसन आणि आटा असा सुमारे दहा लाख ४९ हजार रुपयांचा माल केला आहे. या मालाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या पुणे विभागाचे सहायक आयुक्त दि. वा. भोगावडे यांनी सांगितले. खेड तालुक्यातील खालची भांबुरवाडी येथील येथे विनापरवाना चालविण्यात येणाऱ्या सुपारीच्या कारखान्यावर छापा टाकण्यात आला. तेथे आठ लाख रुपयांची सुपारी जप्त करण्यात आली आहे. नरे येथील एका फरसाणच्या दुकानामध्ये हिरव्या वाटण्यात हानिकारक कृत्रिम रंगांचा वापर करण्यात येत असल्याचे उघडकीस आले. रंगाचे नमुने घेण्यात आले असल्याचे भोगावडे यांनी स्पष्ट केले.

सहायक आयुक्त भोगावडे, नारायण सरकटे आणि प्रदीप आंबरे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही कारवाई केली. या कारवाईत अन्नसुरक्षा अधिकारी स्वाती मरके, सुप्रिया जगताप, संतोष सावंत, सतीश हाके, प्रकाश कचवे, लक्ष्मीकांत साळवे, अभिजित झोडगे, आदित्य जोशी, संकेत सूर्यवंशी आणि नमुना सहायक साळवे सहभागी झाले होते.