पुणे : अन्न व औषध प्रशासनाने चाकण-तळेगाव चौक परिसरात एक कोटी १३ लाख रुपयांचा गुटखा जप्त केला. सुमारे सहा तास पाठलाग करून संबंधित ट्रक जप्त करण्यात आला. आरोपींवर ‘मकोका’अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव ‘एफडीए’ने पोलिसांकडे दिला. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गुटख्याची वाहतूक करणारा ट्रक मध्य प्रदेशातून समृद्धी महामार्गाने भिवंडी आणि ठाण्याच्या दिशेने चालला होता.
अन्न व औषध प्रशासन विभागाने गेल्या चार महिन्यांपासून राज्यांमध्ये सेफ ड्रग सेफ फूड सेफ महाराष्ट्र ही मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे

या अंतर्गत खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्या विरोधात कठोर कारवाई करण्यात येत आहे तसेच गुटखा तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात येत आहेत याच कारवाईचा एक भाग म्हणून पुण्यातील चाकण भागात एक कोटीहून अधिक किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला.
एफडीए’च्या पथकाने १८ सप्टेंबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास या वाहनाचा माग काढण्यास सुरुवात केली. मात्र, चालकाने नियोजित मार्ग बदलून वाहन संगमनेरमार्गे पुण्याच्या दिशेने नेल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले.

मार्ग बदलल्याचे समजताच ठाणे आणि पुणे विभागाची पथके तत्काळ वेगवेगळ्या मार्गांवर तैनात करण्यात आली. राजगुरुनगर टोलनाक्यावर ‘एफडीए’च्या अधिकाऱ्यांनी ट्रक थांबविण्याचा प्रयत्न केला. पण, यश आले नाही. मात्र, अधिकाऱ्यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने पाठलाग सुरू ठेवला. नंतर रात्री आठ वाजता चाकण-तळेगाव चौकात ट्रक अडवून चालकाला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या कारवाई विषयी प्रतिक्रिया देताना सांगितले की, हा प्रकार केवळ कायद्याचे उल्लंघन नसून, सार्वजनिक आरोग्याशी खेळणारा संघटित गुन्हेगारीचा प्रकार आहे. संबंधितांविरुद्ध मोहीम सुरू राहणार आहे.

तक्रार कुठे करावी ?

तक्रारीसाठी प्रशासनाने १८००२२२३६५ हा टोल-फ्री क्रमांक व https://complaints.mahafda.in हे पोर्टल उपलब्ध केले आहे.