पुणे : अवर्षण किंवा अवकाळीमुळे नाही, तर खतांच्या टंचाईमुळे येत्या काही दिवसांत भाजीपाला महागण्याची भीती निर्माण झाली आहे. यापूर्वी कधीही नव्हते इतके देशभरात खतांचे संकट निर्माण झाले असून त्यामुळे राज्यभरात अनेक ठिकाणी भाज्यांची उन्हाळी लागवड झालेली नाही. दोन ते तीन महिन्यांनी भाज्यांचा तुटवडा जाणवेल, त्यामुळे दर कडाडतील, असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. पालेभाज्यांची लागवड ठिबक सिंचनावर केली जात असल्यामुळे शेतकऱ्यांकडून विद्राव्य खतांची मागणी जास्त असते. खतांसाठी एकरी सुमारे दहा हजारांवर येणारा खर्च आता वीस हजारांवर गेला तरीही खते मिळत नाहीत. त्यामुळे पालेभाज्यांच्या लागवडीखालील क्षेत्रात मोठी घट झाल्याची माहिती समोर येत आहे. वाढता वाहतूक खर्च आणि वाढत्या मजुरीमुळे उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. त्या तुलनेत दर मिळत नसल्यामुळेही क्षेत्र घटले आहे. विद्राव्य खतांच्या किमती वाढल्या आहेत. उत्पादन खर्च वाढल्यामुळे आणि इतर कारणांमुळे जुन्नर परिसरात टोमॅटो लागवड ६० टक्क्यांनी कमी झाली आहे. टोमॅटो, शिमला मिरचीला खते जास्त लागत असल्यामुळे ही लागवड टाळून अन्य पालेभाज्यांची लागवड केली जात आहे. शेतकऱ्यांनी यंदा पालेभाज्यांची लागवड टाळून जमिनी मोकळय़ा ठेवल्या आहेत. काही शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळाले आहेत, पण त्याचे प्रमाण कमी आहे, अशी प्रतिक्रिया कृषी नवकल्पना फार्मर प्रोडय़ुसर कंपनीचे अध्यक्ष सागर कारंडे यांनी दिली.यंदा उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे, त्या प्रमाणात उत्पन्न मिळत नाही. केवळ भुताची चाकरी करावी लागते आहे. तीन-चार महिने राबून हातात काहीच राहत नाही, त्यामुळे यंदा उन्हाळय़ात राने मोकळी ठेवली आहेत, असे तासगाव (सांगली) येथील प्रगतशील शेतकरी आनंदराव जाधव यांनी सांगितले.

समस्या काय? 

राज्यात विद्राव्य खतांचा ठणठणाट आहे. दीडपट, दुप्पट पैसे मोजूनही खते मिळत नाहीत. गेल्या दोन महिन्यांपासून अशीच अवस्था आहे आणि पुढील दीड-दोन महिन्यांत यात फारसा फरक पडेल, अशी चिन्हे नाहीत. या टंचाईचा सर्वाधिक परिणाम पालेभाज्या आणि फळांच्या लागवडीवर आणि उत्पादनावर होत आहे. परिणामी सध्या बाजारात पालेभाज्यांची आवक काहीशी कमी झाली आहे. पालेभाज्यांचा सर्वाधिक तुटवडा जून, जुलै महिन्यांत जाणविण्याची शक्यता जाणकार व्यक्त करीत आहेत.

विद्राव्य खते म्हणजे काय

विद्राव्य खते म्हणजे पाण्यात पूर्णपणे विरघळणारी खते. ठिबक सिंचनाद्वारे पालेभाज्या, फळबागांना विद्राव्य खते मोठय़ा प्रमाणावर दिली जातात. देशाच्या एकूण गरजेपैकी सुमारे ९५ टक्के खते चीन, इस्रायल, रशिया, कॅनडा येथून आयात केली जातात. 

काही शेतकरी सेंद्रियकडे वळत आहेत, पण पूर्णपणे सेंद्रिय शेती करणे शक्य नाही. टप्प्याटप्प्याने सेंद्रिय शेती करावी लागेल. प्रायोगिक तत्त्वावर ते शक्य आहे. पण, सार्वत्रिक सेंद्रिय शेती शक्य नाही. लोकांचे पोट भरायचे असेल तर शंभर टक्के सेंद्रिय शेती उपयोगाची नाही.

– रघुनाथ शिंदे, प्रगतशील शेतकरी, खैरेनगर (ता. शिरूर)