पुणे : काँग्रेसने उत्तर प्रदेशातील अमेठी आणि रायबरेलीच्या जागांसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यामध्ये रायबरेलीतून राहुल गांधी यांना तर अमेठीतून किरोशीलाल शर्मा यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. राहुल गांधी यांनी आज अर्ज देखील दाखल केला आहे. पण राहुल गांधी यांच्या रायबरेलीच्या उमेदवारीवरून भाजप नेत्याकडून टीका होऊ लागली आहे. आज पुणे श्रमिक पत्रकार संघाने भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या वार्तालापाचे आयोजन केले होते. त्यावेळी देशभरातील अनेक राजकीय घडामोडींबाबत त्यांनी भाष्य केले.

विनोद तावडे म्हणाले की, देशभरात लोकसभा निवडणूक होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्या सभा होत आहे. या सभांना नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आम्ही यंदा नक्कीच ४०० पार जाऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा – पुणे: शिक्रापूर परिसरात दरोडा; ज्येष्ठ महिलेचा खून

एका बाजूला आमच्याकडे प्रत्येक ठिकाणी पदाधिकारी, कार्यकर्ते बूथवर काम करित आहेत. तर दुसर्‍या बाजूला विरोधकांना बूथवर पदाधिकारी, कार्यकर्ते मिळत नाही. या मागचे एकच कारण आहे. ते म्हणजे आपण कितीही आणि काहीही केले तरी देखील नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होणार असल्याची भावना विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये असल्याचे तावडे म्हणाले.

हेही वाचा – पत्नी नांदायला येत नसल्याने पोलीस चौकीत तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

वायनाडमध्ये हारू की काय असे वाटत असल्याने प्रियांका गांधी यांना रायबरेलीमधून उमेदवारी न देता, राहुल गांधी यांना उमेदवारी घोषित केली आहे. रायबरेलीमधून प्रियांका गांधी या निवडणूक लढविणार हे जवळपास निश्चित झाले होते. पण मागील निवडणुकीत राहुल गांधी यांना अमेठीमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले होते. तसेच यंदाच्या निवडणुकीत वायनाडमध्ये जे चित्र उभे राहिले हे लक्षात आल्यावर वायनाडमध्ये पराभव होण्याच्या भीतीने राहुल गांधी यांनी रायबरेलीमधून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगत तावडे यांनी राहुल गांधींना टोला लगावला.