पुणे : पुणे बुक फेअर अर्थात पुणे पुस्तक जत्रा २८ एप्रिल ते १ मे दरम्यान येरवडा येथील क्रिएटी सिटी मॉल येथे आयोजित करण्यात आली आहे. राज्याचे शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन होणार असून, पुस्तक प्रदर्शनासह साहित्यिक कार्यक्रमांची मेजवानीही मिळणार आहे.
संयोजक पी. एन. आर. राजन यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. महाराष्ट्र साहित्य परिषद, ग्रंथालय संचालनालय (महाराष्ट्र राज्य),पुणे जिल्हा परिषद, पुणे महानगर पालिका, आकाशवाणी आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग यांच्या सहकार्याने हे प्रदर्शन भरवले आहे.
उद्घाटन कार्यक्रमाला ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अशोक कामत, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कोषाध्यक्ष सुनीता राजे पवार, कार्यवाह दीपक करंदीकर, आकाशवाणीचे प्रोग्राम डायरेक्टर इन्द्रजित बागेल, डॉ. सिद्धार्थ धेंडे आणि माजी आमदार रामभाऊ मोझे उपस्थित रहाणार आहेत.
प्रदर्शनात देशभरातील नामवंत पुस्तक प्रकाशन संस्था, शैक्षणिक संस्था, केंद्र आणि राज्य सरकारची प्रकाशने, माहिती, आरोग्य व्यवस्थापन, व्यापार, कायदा, धर्म, राजकारण, साहित्य अशा विविध विषयांवरील पुस्तके, मासिके, ग्रंथ, दृष्टीहीनांसाठी ब्रेल लिपीतील पुस्तके उपलब्ध होतील.
तसेच प्रदर्शनात इंग्रजी लेखकांचा मेळावा २९ एप्रिलला सायंकाळी साडेपाच वाजता, महाराष्ट्र साहित्य परिषद विश्रांतवाडी शाखा आयोजित गझलकार दीपक करंदीकर प्रा. माधव राजगुरू, उध्दव कानडे या ज्येष्ठ कवीच्या उपस्थितीत निमंत्रित कवींचे संमेलन, १ मे रोजी सकाळी अकरा वाजता लेखक आपल्या भेटीला, कायक्र्रमात ज्येष्ठ प्रकाशक सु. वा. जोशी, ज्येष्ठ संपादक विनया खडपेकर, संपादक आणि लेखक मनोहर सोनवणे, एकपात्री कलाकार बंडा जोशी, बाल साहित्यकार डॉ. संगीता बर्वे यांच्याशी दीपक करंदीकर संवाद साधतील.
पुणे बुक फेअर हे प्रदर्शन क्रिएटी सिटी मॉल येथे सकाळी अकरा ते सायंकाळी सात या वेळेत सर्वासाठी खुले राहील.