पुणे : गेल्या दोन महिन्यांत तीव्र थंडी आणि तापमानातील चढ-उतार अनुभवायला मिळाले. आता हिवाळा अखेरच्या टप्प्यात असून, तापमान वाढण्यास सुरुवात होऊन फेब्रुवारीमध्ये राज्यासह पुण्यातही कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता हवामानतज्ज्ञांनी वर्तवली आहे.

उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे यंदा डिसेंबरमध्ये सातत्याने किमान तापमानात घट होत राहिली. त्यामुळे डिसेंबर महिना दशकभरातील सर्वांत थंड ठरला. त्यानंतर जानेवारीमध्ये हवामानात बदल झाले. उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमध्ये बदल झाल्याने थंडी कमी-जास्त होत राहिली. त्यामुळे काही वेळा किमान तापमान एक अंकी नोंदवले गेले, तर काहीवेळा किमान तापमानात वाढ होऊन ते १८ अंश सेल्सियसपर्यंत वाढले होते. आता फेब्रुवारी महिना सुरू झाल्यापासून रात्री-पहाटे आल्हाददायक गारवा, दिवसा ऊन, उकाडा असे वातावरण आहे.भारतीय हवामानशास्त्र विभागाने फेब्रुवारीमध्ये महाराष्ट्रासह देशभरात कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.

या पार्श्वभूमीवर हवामानशास्त्र विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सानप यांनी दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारीमध्ये पुण्यासह राज्यात कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमानात सातत्याने चढ-उतार होत आहेत. उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांच्या प्रभावामुळे एखाद्या वेळी किमान तापमानात घटही होऊ शकते.

हिवाळा आता अखेरच्या टप्प्यात आहे. त्यामुळे १५ फेब्रुवारीनंतर तापमान वाढण्यास सुरुवात होईल. पुढील काही दिवसांत रात्रीच्या तापमानात वाढ होऊ शकते, असे ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ अनुपम कश्यपी यांनी सांगितले.

जानेवारीतील कमाल-किमान तापमान

पुण्यात शिवाजीनगर येथे जानेवारीमध्ये सरासरी किमान १३.६ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. हवामान विभागाच्या २०१४पासूनच्या आकडेवारीचा आढावा घेतला असता, जानेवारीत शिवाजीनगर येथे नोंदवले गेलेले तिसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक सरासरी किमान तापमान ठरले. यापूर्वी २०२५मध्ये १३.८, २०२१मध्ये १५.७ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले होते. तर, २०१९मध्ये नीचांकी १०.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. त्याशिवाय, यंदा जानेवारीत सरासरी कमाल तापमान २९.८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले असून, ते जानेवारीतील दुसऱ्या क्रमांकाचे नीचांकी कमाल तापमान आहे. यापूर्वी २०१५ आणि २०२२मध्ये २८.६, २०१४मध्ये २८.७ अंश तापमानाची नोंद झाली होती. जानेवारीमध्ये उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमध्ये झालेल्या बदलांमध्ये तापमानात सातत्याने चढ-उतार झाल्याचे दिसून आले होते.