साहित्य संमेलनाच्या तोंडावर एखाद्या साहित्यविषयक कार्यक्रमाला हजेरी लावताना पोटात गोळाच येतो. एखादा पुरस्कार जाहीर करताना तो परत तर केला जाणार नाही ना, अशी धास्तीच वाटते. संमेलन म्हणजे वाद, असे समीकरण झाले आहे. आगामी संमेलनात तरी कमीत कमी वाद व्हावेत, अशी टिपणी राज्याचे सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांनी पिंपरीत बोलताना केली. पुरस्कार परत करण्यापेक्षा साहित्यिकांनी त्यांच्या भावना स्पष्टपणे मांडाव्यात, त्या जनतेपर्यंत पोहोचाव्यात, असे आवाहनही त्यांनी केले.
पिंपरी-चिंचवड शहरामध्ये होणाऱ्या ८९ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या संकेतस्थळाचे उद्घाटन तावडे यांच्या हस्ते झाले, तेव्हा ते बोलत होते. डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. माधवी वैद्य होत्या. साहित्य संमेलनाचे मावळते अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील, प्रकाश पायगुडे, सुनील महाजन आदी उपस्थित होते.
तावडे म्हणाले,की साहित्य संमेलनाच्या तोंडावर कोणता तरी वाद होईल, याची धास्तीच वाटते. वाद खरा की खोटा, हा नंतरचा भाग. माझ्याकडील खाती पण अशीच आहेत. संमेलन अध्यक्षपदाची अजून निवड झाली नसताना उद्घाटन कोण करणार, मोदी येणार की नाहीत, यावरून वाद सुरू झाले आहेत. मात्र, ही निष्फळ चर्चा आहे. साहित्यिकांना मोकळीक असली पाहिजे, राजसत्तेने त्यांना पाठबळ दिले पाहिजे. त्यासाठीच वेळेपूर्वीच साहित्य संमेलनासाठी २५ लाखाचा निधी महामंडळाकडे वर्ग करण्यात आला. साहित्यिकांचे समाजातील स्थान वेगळे आहे. त्यांना निधीसाठी हेलपाटे मारावे लागणे चुकीचे आहे. मराठी भाषेचे, भाषिकांचे संवर्धन करण्याविषयी राजकीय पक्षांची गल्लत होते आहे. मराठी पाटय़ा म्हणजे मराठी नाही. भाषा संवर्धनासाठी वेगळे प्रयत्न व्हायला हवेत. आपल्याकडे चांगले साहित्य भाषांतरित होत नाही. त्यामुळे ‘नोबेल’ पारितोषिक मिळणे दूरच, ‘ज्ञानपीठा’लाही दमछाक होताना दिसते. मराठी वाचले जात नाही, ही तक्रार खोटी आहे. कोटय़वधींची पुस्तकविक्री होते, हे कशाचे द्योतक आहे. पाच लाख पुस्तके उपलब्ध असलेले पुस्तकांचे गाव उभारण्याचा मानस आहे. कवी, लेखक सुटीच्या दिवशी तेथे राहतील आणि साहित्यविषयक विस्ताराने चर्चा होईल, अशी संकल्पना त्यामागे आहे. प्रास्ताविक डॉ. पी. डी. पाटील यांनी केले. सूत्रसंचालन उद्धव कानडे यांनी केले.
रामकृष्ण नाईक, रजनी जोशी यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कार
यंदाचा नटवर्य प्रभाकर पणशीकर जीवनगौरव पुरस्कार रामकृष्ण नाईक यांना, तर संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार रजनी जोशी यांना जाहीर करण्यात येत असल्याची घोषणा सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे यांनी या वेळी केली.