महाराष्ट्र अॅकॅडमी ऑफ सायन्सेसतर्फे मराठी विज्ञान परिषदेचे कार्यवाह डॉ. अनंत पांडुरंग ऊर्फ अ. पां. देशपांडे यांना गौरववृत्ती (फेलोशिप) जाहीर झाली आहे. विज्ञान प्रसाराचे दीर्घकाळ काम करणाऱ्यास प्रथमच ही गौरववृत्ती देण्यात येत आहे. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (एनसीएल) येथे गुरुवारी (५ डिसेंबर) दुपारी दोन वाजता होणाऱ्या कार्यक्रमात देशपांडे यांना ही गौरववृत्ती प्रदान करण्यात येणार आहे.
देशपांडे १९७० पासून मराठी विज्ञान परिषदेच्या माध्यमातून विज्ञान प्रसाराचे काम करत आहेत. व्याख्याने, प्रशिक्षण वर्ग, विज्ञान पत्रिका आणि परिषदेच्या शाखांच्या कामांना प्रोत्साहन यामध्ये ते अग्रेसर राहिले. डॉ. जयंत नारळीकर, डॉ. अनिल काकोडकर, डॉ. रघुनाथ माशेलकर यांसारख्या ज्येष्ठ शास्त्रज्ञांना त्यांनी परिषदेच्या कार्याशी जोडून घेतले. सवाई गंधर्व संगीत महोत्सवाच्या सुवर्णमहोत्सवाचा इतिहास सांगणाऱ्या देशपांडे यांच्या ‘स्वरयज्ञ’ या पुस्तकाचे प्रकाशन स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांच्या हस्ते झाले होते.