पुणे : प्रसिद्ध छायाचित्रकार आणि चित्रपट छायालेखक नवरोज कान्ट्रॅक्टर यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन ७ ते १३ जुलै या कालावधीत घोले रस्ता येथील राजा रवी वर्मा कलादालन येथे आणि त्यांनी छायांकित केलेल्या चार चित्रपटांचा महोत्सव ११ ते १३ जुलै या कालावधीत राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे होणार आहे.
नवरोज यांनी राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेतून (एफटीआयआय) चित्रपटाचे शिक्षण घेतले. अनेक समांतर चित्रपटांचे छायांकन त्यांनी केले. त्याशिवाय छायाचित्रकार म्हणूनही त्यांचे काम गौरवले गेले आहे. मोटरबाइकप्रेमी असलेले नवरोज यांचे २०२३ मध्ये निधन झाले. त्यांच्या कार्याला सलाम करण्याच्या उद्देशाने त्यांच्या छायाचित्रांच्या आणि त्यांनी छायांकित केलेल्या चित्रपटांचा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. ज्येष्ठ वास्तुरचनाकार आणि दिग्दर्शक नचिकेत पटवर्धन यांच्या हस्ते सोमवारी (७ जुलै) सायंकाळी पाच वाजता छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे.
राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयातर्फे आयोजित चित्रपट महोत्सवात ११ जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजता ‘क्या हुआ इस शहर को’, १२ जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजता ‘हुन हुन हुन्शीलाल’, १३ जुलै रोजी सकाळी ११ वाजता ‘लिमिटेड माणुसकी’, दुपारी दोन वाजता ‘पर्सी’ तर सायंकाळी पाच वाजता चर्चासत्र होणार आहे. सायंकाळी साडेसहा वाजता दाखविण्यात येणाऱ्या ‘दुविधा’ या चित्रपटाने महोत्सवाचा समारोप होणार आहे.