भारतीय सिनेमाच्या शताब्दीनिमित्त आशय फिल्म कल्ब, व्ही. शांताराम फाउंडेशन आणि शांतश्री मीडिया यांच्यातर्फे चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा चित्रपट महोत्सव १० ते १३ मे कालावधीत राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे होणार आहे.
महोत्सवाचे उद्घाटन महेश मांजरेकर यांच्या हस्ते १० मे रोजी दुपारी ४ वाजता होणार आहे. पहिल्या दिवशी त्यांच्या ‘कोकणस्थ’ चित्रपटाचे विशेष प्रदर्शन करण्यात येणार आहे. चित्रपटातील कलाकार या वेळी उपस्थित राहणार आहेत. महोत्सवामध्ये प्रादेशिक भाषांमधील ‘अबू-सन ऑफ अॅडम’, ‘कुर्मावतार’ ‘अन्हे घोरे दा दान’, ‘उन्नीशे एप्रिल’ हे चित्रपट दाखविले जाणार आहेत. तसेच ‘सेल्यूलाइड मॅन’ हा अनुबोधपटही दाखविला जाणार आहे. ‘अनुमती’ चित्रपटाने महोत्सवाची सांगता होणार आहे. ज्येष्ठ गायिका शमशाद बेगम आणि अभिनेते प्राण यांच्या आठवणींचा मागोवा घेणारे दृक्-श्राव्य कार्यक्रम सिद्धार्थ बेंद्रे सादर करणार आहेत. महोत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी प्रवेशिका आवश्यक असून त्या ८ मे पासून नीलायम टॉकिज जवळील पाथफाइंडर येथे उपलब्ध असतील.