सांस्कृतिक, जातीय व राजकीय समानतेबरोबरच या देशाला आर्थिक समानतेचीही आवश्यकता आहे. ही समानता नसल्याने नक्षलवाद निर्माण होतो. नक्षलवादाचे कधीच समर्थन होऊ शकत नाही, मात्र ही स्थिती बदलण्यासाठी आर्थिक समानता आली पाहिजे, असे मत ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ते व पटना विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. रामजी सिंग यांनी व्यक्त केले.
शहर काँग्रेसच्या वतीने गांधी सप्ताहानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सिंग यांचे भाषण झाले. त्यापूर्वी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. काँग्रेसचे शहराध्यक्ष अभय छाजेड त्या वेळी उपस्थित होते. सिंह म्हणाले, की देशामध्ये आर्थिक विषमतेची दरी वाढत आहे. ७८ करोड लोकांची रोजचे उत्पन्न वीस रुपयांहून कमी आहे. या स्थितीत नक्षलवाद का नाही निर्माण होणार? बहुतांश विकास हा चुकीच्या दिशेने होत आहे. आर्थिक समानतेतून अनेक समस्या सुटू शकतील.
भारत केवळ हिंदूचा नाही, तर इतर धर्मीयांचाही आहे, असे सांगून ते म्हणाले, की या देशात हिंदूंचे प्राबल्य असेल, पण म्हणून या देश हिंदूचा नाही. पाकिस्तानची निर्मिती झाली, तरी १४ कोटी मुस्लीम बांधव या देशात आहेत. त्याचबरोबरीने इतर धर्माचे लोकही येथे राहतात. त्याचप्रमाणे दहशतवादी केवळ मुस्लिमांमध्येच नाहीत. गांधीजी, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या हत्या झाल्या. त्यात मुस्लीम नव्हते.
नरेंद्र मोदी यांच्याविषयी ते म्हणाले, की मोदी हे भारतीय जनता पक्षाचे नव्हे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उमेदवार आहेत. गुजरात दंगलीनंतर अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांना राजधर्म पाळण्याचा संदेश दिला होता. त्याच वेळी त्यांनी राजीनामा देणे आवश्यक होते.