सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात मुलींच्या वसतिगृहाच्या परिसरात एका विद्यार्थिनीला शिवीगाळ करून तिचा विनयभंग करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी विद्यापीठातील निवृत्त कर्मचाऱ्याच्या मुलाविरुद्ध चतु:शृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा >>> पुणे : शहरात पादचारी महिलांचे दागिने हिसकावून चोरण्याचे प्रकार वाढले

दीपक सौंदे  ( वय २८, रा. शिवाजीनगर) असे गु्न्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. तो पसार झाला असून त्याच्या शोधासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत. याबाबत एका विद्यार्थिनीने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नववर्षाच्या पूर्वसंध्येला विद्यार्थिनी मुलींच्या वसतिगृहाजवळ मित्राशी गप्पा मारत थांबली होती. मद्यधुंद अवस्थेत असलेला आरोपी सौदे तेथे गेला. त्याने विद्यार्थिनीला शिवीगाळ केली.  तिला जीवे मारण्याची धमकी देऊन तो पसार झाला. घाबरलेल्या विद्यार्थिनीने पोलिसांकडे तक्रार दिली. दरम्यान, अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी विद्यापीठाच्या आवारामध्ये पोलिसांची गस्त वाढवण्यात येणार असून विद्यापीठाच्या सुरक्षा रक्षकांनाही त्याबाबत सतर्क करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सहायक पोलीस निरीक्षक झरेकर तपास करत आहे.