पुणे : महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीवेळी शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रुपाली पाटील-ठोंबरे यांच्याविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
या बाबत महापालिकेचे उपअभियंता सुधीर अलूरकर यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २५ आणि प्रभाग क्रमांक २६ मधून पाटील यांनी निवडणूक लढवली. त्याची मतमोजणी १६ जानेवारी राेजी टिळक स्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलच्या आवारात झाली. त्या वेळी ईव्हीएम यंत्र बदलली असल्याचा आरोप पाटील यांनी घेतला.
पाटील यांनी लेखी हरकत नोंदवली. या अर्जाची पोच देण्याचा आग्रह त्यांनी धरला. मतमोजणी केंद्रावरील जाळीजवळ जाऊन तेथील अधिकाऱ्यांशी असभ्य भाषेत संवाद साधला. शासकीय कामकाजात अडथळा आणला, असे उपअभियंता सुधीर अलूरकर यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
