म्हात्रे पुलाजवळील चार मंगल कार्यालयांच्या चालकांवर कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा –

मंगलकार्यालय भाडय़ाने देताना वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था न करणाऱ्या डीपी रस्त्यावरील चार मंगल कार्यालयांच्या चालकांवर कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगलकार्यालय भाडय़ाने देताना महापालिकेला दिलेल्या नाकाशाप्रमाणे नागरिकांच्या वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था न करणाऱ्या डीपी रस्त्यावरील चार मंगल कार्यालयांच्या चालकांवर कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच बरोबर मंगलकार्यालयाच्या समोर रस्त्यावर वाहने लावणाऱ्या पाच चारचाकी, ३१ दुचाकींवर आणि एका जनेसेटवर कारवाई करून नऊ हजार रुपयांचा दंड वसूल केला.
वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हात्रे पुलाजवळील डीपी रस्त्यावर असणारे कृष्ण सुंदर गार्डन, कृष्ण सुंदर लॉन्स, सृष्टी गार्डन आणि सिद्धी गार्डन मंगल कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची वाहने समोरील रस्त्यावर पार्किंग केल्यामुळे वारंवार वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाल्याने त्यांना सीआरपीसी कलम १४९ अनुसार नोटीस दिली होती. सार्वजनिक रस्त्यावर मंगल कार्यालयात आलेल्या नागरिकांनी वाहने लावू नये, याची खबरदारी घेण्याच्या सूचना वाहतूक पोलिसांनी दिल्या होत्या. मात्र, ३० नोव्हेंबर रोजी रात्री सात ते साडेअकरा दरम्यान या रस्त्यावरच वाहने लावल्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाल्याचे दिसून आले. त्यामुळे या वाहनांचे फोटो काढून त्याच्यावर कारवाई करण्यात आली. या मंगल कार्यालयचालकांनी ते लग्न समारंभासाठी देताना महापालिकेने मान्य केलेल्या नकाशाप्रमाणे पार्किंग जागेत नागरिकांसाठी पार्किंगची व्यवस्था केली नाही. त्यामुळे या ठिकाणी आलेल्या नागरिकांनी सार्वजनिक रस्त्यावर वाहने लावल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. त्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होईल असे कृत्य केल्याच्या आरोपावरून कोथरूड पोलीस ठाण्यात चार मंगल कार्यालयांच्या चालकांविरुद्ध भारतीय दंड संहिता २८३ अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Fir on 4 owners of mangal karyalaya near mhatre bridge

ताज्या बातम्या