पुणे : पोलीस हवालदाराच्या मुलाकडून रिव्हाॅल्वरमधून गोळीबार करण्यात आल्याची चित्रफीत नुकतीच प्रसारित झाली. याप्रकरणी वालचंदनगर पोलिसांनी पुणे ग्रामीण पोलीस दलातील हवालदारासह मुलांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
याप्रकरणी पोलीस हवालदार रमेश बाबूराव केकाण, पार्थ रमेश केकाण, अथर्व रमेश केकाण (रा. वाकड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे यांनी वालचंदनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हवालदार रमेश केकाण पुणे ग्रामीण पोलिसांच्या मुख्यालयात नियुक्तीस आहेत. केकाण यांच्याकडे शस्त्र परवाना आहे. तीन वर्षांपूर्वी केकाण कुटुंबीय इंदापूर परिसरातील कळस गावातील सासूरवाडीत आले होते. त्यावेळी केकाण यांचा मुलगा पार्थने रिव्हाॅल्वरमधून हवेत गोळीबार केला. हवेत गोळीबाराचे चित्रीकरण मोबाइलद्वारे केकाण यांचा मुलगा अथर्वने केले होते. हवेत गोळीबार केल्याची चित्रफीत पार्थने नुकतीच समाजमाध्यमात प्रसारित केली. समाजमाध्यमात चित्रफीत प्रसारित झाल्यानंतर पोेलिसांनी तपास सुरु केला. तेव्हा इंदापूर तालुक्यातील कळस गावात पार्थने गोळीबार केल्याचे उघड झाले.
हे ही वाचा… पुणे रेल्वे स्थानक ‘पाण्यात’! बॅग, सामानासह पाण्यातून वाट काढण्याची प्रवाशांवर वेळ
हे ही वाचा… शरद पवार-सुनीता केजरीवाल यांची पुण्यात भेट
पोलीस हवालदार केकाण यांनी मुलगा पार्थला रिव्हाॅल्वर दिल्याचे तपासात उघड झाले. त्यानंतर याप्रकरणात हवालदारासह त्यांच्या दोन्ही मुलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.