पुण्यातील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या (एनसीएल) आवारातील एका दुमजली इमारतीत सोमवारी रात्री आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. मात्र, दुमजली इमारतीतील अंतर्गत भाग पूर्णपणे भस्मसात झाला. आगीमागचे कारण समजू शकले नाही.
पाषाण रस्त्यावरील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या मुख्य इमारतीच्या मागील बाजूस असलेल्या दुमजली इमारतीत रात्री पावणेनऊच्या सुमारास आग लागली. एनसीएलमधील अधिकाऱ्यांनी या घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली. औंध येथील अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी काही मिनिटांत दाखल झाला. आगीचे स्वरूप पाहता तातडीने अन्य केंद्रातील बंब आणि अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन जवानांनी इमारतीच्या चारही बाजूंनी पाण्याचा मारा केला. एनसीएलच्या आवारात अन्य इमारती आहेत. रासायनिक पदार्थांचा स्फोट होण्याची शक्यता तसेच अन्य इमारतींना आगीची झळ पोहोचण्याची शक्यता असल्याने जवानांनी उपाययोजना सुरू केल्या. अर्ध्या तासात आग आटोक्यात आली. शेजारी असलेल्या इमारतीला झळ पोहोचली नाही.
आग लागलेल्या दुमजली इमारतीतील अंतर्गत भाग पूर्णपणे जळाला आहे. ज्या इमारतीत आग लागली, तेथे सध्या नूतनीकरणाचे काम सुरू होते. आगीमागचे कारण अद्याप सांगता येणार नाही, असे एनसीएलमधील अधिकाऱ्यांनी सांगितले. यापूर्वी एनसीएलच्या आवारात वाढलेल्या गवताला आग लागण्याची घटना घडली होती. त्यावेळी शेजारी असलेल्या सोसायटीतील बंगल्यातील साहित्य जळाले होते.