पुणे : दौंडहून पुण्याकडे जाणाऱ्या डिझेल इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट (डेमू) गाडीच्या एका डब्यात सोमवारी सकाळी यवत रेल्वे स्थानकाजवळ आग लागल्याचा प्रकार घडला. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. डब्यातून धूर बाहेर पडत असल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
पुणे रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, दौंडहून येणारी ही गाडी सकाळी ७.५२ वाजता यवत स्थानकावर थांबली होती. त्याच दरम्यान, एक मध्यमवयीन व्यक्ती डब्यात आला आणि त्याने बिडी पेटवून स्वच्छतागृहाजवळ असलेल्या कचरापेटीत टाकली. त्यानंतर डब्यातून धूर येऊ लागला. गाडी स्थानकावरच असल्याने रेल्वेचे कर्मचारी व रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) आगीवर तत्काळ नियंत्रण मिळवले.
दौंड स्थानकावरून पुण्याकडे नियमित वेळापत्रकानुसार निघालेली डेमू यवत स्थानकावर थांबलेली असताना आग लागून डब्यातून धूर येऊ लागला. मात्र, आरपीएफ आणि रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी अग्निशामक यंत्राच्या साहाय्याने आग विझवली. सकाळी ७.५२ वाजता घटना घडली. आग विझल्यानंतर गाडी ८.१४ वाजता स्थानकावरून रवाना झाली, अशी माहिती मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी हेमंतकुमार बेहरा यांनी दिली.
दरम्यान, या घटनेनंतर मध्य प्रदेशातील ५५ वर्षीय मोहनलाल कौल या भिक्षेकऱ्याला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार असून, पुढील कारवाई करण्यात येईल, असे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त आरपीएफच्या प्रियांका शर्मा यांनी सांगितले.