‘सीरम’मध्ये भीषण आग

पाच कामगारांचा होरपळून मृत्यू; लस उत्पादनावर परिणाम नसल्याची ग्वाही

(संग्रहित छायाचित्र)
करोना लसनिर्मिती सुरू असलेल्या सीरम इन्स्टिटय़ूटमध्ये गुरुवारी दुपारी भीषण आग लागली. त्यात पाच कामगारांचा होरपळून मृत्यू झाला असून, त्यात एका महिलेचा समावेश आहे. नऊ कामगारांची सुखरूप सुटका करण्यात अग्निशमन दलाला यश आले. मात्र, या आगीचा ‘कोव्हिशिल्ड’  लसनिर्मितीवर परिणाम होणार नसल्याचे ‘सीरम’ने स्पष्ट केले.  या आगीमध्ये रमा शंकर हरिजन, बिपीन सरोज (दोघेही रा. उत्तर प्रदेश), सुशील कुमार पांडेय (रा. बिहार), महेंद्र इंगळे आणि प्रतीक पाष्टे (दोघेही रा. पुणे) यांचा होरपळून मृत्यू झाला. हे सर्व जण विद्युतविषयक काम करणारे कंत्राटी कामगार होते.

इन्स्टिटय़ूटच्या नव्या इमारतीमध्ये तिसऱ्या मजल्यावर वेल्डिंगचे काम सुरू असताना ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. इमारतीचा वरील भाग आगीच्या ज्वालांनी कवेत घेतला होता. धुराचे उंच लोट आगीची तीव्रता दर्शवत होते. तब्बल अडीच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर दहा अग्निशमन बंब आणि चार खासगी टँकरच्या साहाय्याने पाण्याचा मारा करत जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविले. आगीत होरपळलेल्या कामगारांना सुरुवातीला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

घटनेची माहिती मिळताच महापौर मुरलीधर मोहोळ, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, मुख्य अग्निशमन अधिकारी प्रशांत रणपिसे, हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ बाळकृष्ण कदम यांनी घटनास्थळी धाव घेतली.

आगीची घटना गुरुवारी दुपारी अडीचच्या सुमारास घडली. मांजरी बुद्रुकच्या (गोपाळपट्टी) बाजूकडे असलेल्या प्रवेशद्वाराजवळ नव्याने बांधण्यात आलेल्या सहा मजली इमारतीच्या पाचव्या व सहाव्या मजल्यावर ही आग लागली. आग लागली त्या ठिकाणी काही कामगार दैनंदिन काम करत होते.

अग्निशमन दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी पावणेतीनच्या सुमारास अग्निशमन केंद्राच्या मुख्य नियंत्रण कक्षाला आग लागल्याची वर्दी मिळाली. अग्निशमन मुख्यालयासह शहरातील इतर केंद्रातील दहा गाडय़ांनी जवानांसह घटनास्थळी धाव घेतली. अथक प्रयत्नानंतर सव्वाचारच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविण्यात जवानांना यश आले. या वेळी नऊ कामगारांना इमारतीतून सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले. मात्र, सर्वात वरच्या मजल्यावर पाच कामगार होरपळलेल्या अवस्थेत आढळले.

दरम्यान, सीरम इन्स्टिटय़ूटच्या टर्मिनल एकमध्ये पाचव्या मजल्यावर पुन्हा किरकोळ आग लागली होती. अग्निशमन दलाकडून पाण्याचा मारा करून ही आग शमविण्यात आली.

– नऊ कामगारांची सुखरूप सुटका

– इमारतीचे सहापैकी तीन मजले खाक

– अडीच तासांनंतर आगीवर नियंत्रण

– पाचव्या मजल्यावर पुन्हा किरकोळ आग

सर्व यंत्रणांकडून गंभीर दखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सीरम इन्स्टिटय़ूटला भेट दिली होती. त्याच इमारतीत ही आग लागली. करोनाची लस सीरम इन्स्टिटय़ूटमध्ये तयार करण्यात येत असल्याने सर्व यंत्रणांनी या घटनेकडे गांभीर्याने लक्ष दिले आहे. केंद्रीय संस्थांनीही ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली आहे की अन्य काही कारणांमुळे याचाही शोध घेण्यास सुरुवात केली आहे. आग आणि धुरामुळे बचाव कार्यात सहकार्य करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचा (एनडीआरएफ) चमू सीरम इन्स्टिटय़ूटकडे रवाना झाला होता.

मुख्यमंत्री आज पुण्यात

सीरम इन्स्टिटय़ूटमध्ये लागलेल्या आगीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली. ठाकरे यांनी या दुर्घटनेची विभागीय आयुक्त तसेच महापालिका आयुक्तांकडून माहिती घेतली. मुख्यमंत्री आज, शुक्रवारी सीरम इन्स्टिटय़ूटला भेट देणार आहेत.

‘..पण, भाऊ आलाच नाही’

अविनाश कुमार भावविवश

‘भाई, चलो जल्दी’ असे म्हणत तिसऱ्या मजल्यावरील खिडकीजवळ येऊन तेथून खाली असलेल्या वाळूच्या ढिगाऱ्यावर मी उडी मारली. पण, भाऊ बिपीन खाली आलाच नाही, असे सांगताना अविनाश कुमार याला भावना अनावर झाल्या. सीरम इन्स्टिटय़ूटमध्ये लागलेल्या आगीत अविनाश कुमार याने आपला भाऊ गमावला.

कंत्राटदाराचे कामगार

आग लागलेली इमारत ही नवीन होती. त्यामुळे तेथे फर्निचर व इलेक्ट्रिकचे काम सुरू होते. एका कंत्राटदाराचे कामगार तेथे काही दिवसांपासून काम करीत होते. त्यानुसार, काही कामगार गुरुवारी तेथे काम करीत होते. त्याचवेळी आगीची घटना घडली. त्यापैकी तिसऱ्या मजल्यावरील पाच जणांना अग्निशामक दलाने बाहेर काढले. मात्र, पाचव्या मजल्यावरील कामगारांना समजेपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. त्यामध्ये पाच कामगारांचा होरपळून मृत्यू झाला.

अजित पवार यांची घटनास्थळी भेट

सीरम इन्स्टिटय़ूटला आग नेमकी कशामुळे लागली या संदर्भात शुक्रवारी (२२ जानेवारी) अत्यंत बारकाईने लेखापरीक्षण करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी सांगितले. पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन आगीच्या दुर्घटनेची माहिती घेतली, त्या वेळी ते बोलत होते.

कोव्हिशिल्ड’च्या उत्पादनात खंड नाही

अदर पूनावाला यांची ग्वाही; मृतांच्या कुटुंबीयांना २५ लाखांची मदत

पुणे : अनपेक्षित अडचणींच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून कोव्हिशिल्डचे उत्पादन विविध इमारतींमध्ये करण्याची तयारी ठेवण्यात आली होती. त्यामुळे करोना प्रतिबंधक कोव्हिशिल्ड लशीच्या पुरवठय़ात अडचण येणार नसल्याचे सीरम इन्स्टिटय़ूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी गुरुवारी स्पष्ट के ले आहे.

आगीमुळे मोठे नुकसान झाले असले, तरी कोव्हिशिल्ड लशीचे उत्पादन आणि पुरवठय़ात कोणताही खंड पडणार नाही याची ग्वाही मी देशातील जनतेला देतो. या आगीत आमच्या काही सहकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. या प्राणहानीचे आम्हाला अतीव दु:ख होत आहे. आम्ही या कठीण प्रसंगात त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहोत, असे पूनावाला यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, सीरमचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सायरस पूनावाला यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

आपत्कालीन परिस्थितीत लसनिर्मितीत खंड पडू नये, यासाठी काही इमारती राखीव ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे ‘कोव्हीशिल्ड’ लशीचे उत्पादन आणि पुरवठय़ात खंड पडणार नाही, याची ग्वाही मी सरकार आणि देशातील जनतेला देतो.

-अदर पूनावाला, मुख्य कार्यकारी अधिकारी, सीरम इन्स्टिटय़ूट

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Fire in the serum five workers died on the spot abn

ताज्या बातम्या