या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अग्निशमन दलाच्या बंबासाठीचे शुल्क भरले नाही

औरंगाबाद येथील दोनशे फटाके विक्री स्टॉल्सला शनिवारी लागलेल्या आगीच्या पाश्र्वभूमीवर पुण्यातील फटाके विक्रेत्यांची अक्षम्य हलगर्जी उघड झाली आहे. म्हात्रे पुलानजीक असलेल्या फटाका विक्रेत्यांनी यंदा वडगाव शेरीतील मुळीक गार्डन येथे खासगी जागेत स्टॉल थाटले आहेत. मात्र, महापालिकेच्या मालमत्ता व्यवस्थापन विभागाकडे त्यांनी अग्निशमन दलाच्या बंबाची मागणी देखील केली नाही. खासगी जागेत स्टॉल सुरू केल्यामुळे फटाके विक्रेत्यांनी मालमत्ता विभागाकडे बंबासाठी लागणारे शुल्क भरले नसल्याचे उघड झाले आहे.

पुणे महापालिकेच्या मालमत्ता व्यवस्थापन विभागाने यंदा पंधरा ठिकाणी फटाके विक्रीचे स्टॉल्स उभारण्याची परवानगी दिली आहे. शहरात म्हात्रे पूल भागात दरवर्षी फटाका स्टॉल्स उभारण्यात येतात. मात्र, यंदा महापालिकेने तेथे फटाका स्टॉल्सला परवानगी दिली नाही. त्यामुळे तेथील फटाका स्टॉलधारकांनी वडगाव शेरीतील मुळीक गार्डन येथे स्टॉल्स उभारले तसेच हडपसर येथील भोसले गार्डन, शनिवार पेठेतील वर्तक उद्यानाजवळ, सातारा रस्त्यावरील के.के.मार्केट, धनकवडी गाव शेवटचा बसथांबा, भारती विद्यापीठ, विश्रांतवाडीतील परुळेकर विद्यालयाचे मैदानासह पंधरा ठिकाणी स्टॉल्स उभारण्यास परवानगी दिली आहे, अशी माहिती अग्निशमन दलाचे कें द्रप्रमुख प्रशांत रणपिसे यांनी दिली.

मालमत्ता व्यवस्थापन विभागाकडून फटाका विक्री स्टॉल्सला परवानगी देण्याचे काम पाहिले जाते. अग्निशमन दलाकडून स्टॉल्सला ना-हरकत प्रमाणपत्र दिले जाते. गेल्या दोन दिवसांपासून अग्निशमन दलाने स्टॉल्सची पाहणी केली. फटाका विक्रेत्यांनी सुरक्षाविषयक उपाययोजना केल्या आहेत का नाही, याबाबतचा आढावा घेण्यात आला.

स्टॉलधारकांना सुरक्षाविषयक उपाययोजना करण्याच्या सूचना यापूर्वीच देण्यात आल्या आहेत. दोन स्टॉल्समध्ये अंतर ठेवावे, दुर्घटना टाळण्यासाठी अग्निशमन यंत्रणा (फायर एक्स्टींग्विशर), वाळू ठेवावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत. मुळीक गार्डनसह शहरातील विविध ठिकाणी उभारण्यात आलेल्या स्टॉलधारकांनी बंबाची मागणी अद्याप केलेली नाही. त्यासाठी मालमत्ता व्यवस्थापन विभागाकडे शुल्क भरावे लागते, असे त्यांनी सांगितले.

प्रतिदिवशी चोवीस हजार रुपये शुल्क

अग्निशमन दलाचा बंब खासगी ठिकाणी ठेवायचा असल्यास त्याचे शुल्क भरावे लागते. चोवीस तासांसाठी चोवीस हजार रुपये एवढे शुल्क आकाराले जाते. खासगी कार्यक्रम आयोजित करणाऱ्या संयोजकांना हे भाडे परवडणारे नाही. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी इच्छा असूनही अग्निशमन दलाचा बंब संयोजक ठेवू शकत नाहीत. एवढे शुल्क भरण्यापेक्षा आग लागली, तर बंब घटनास्थळी दाखल होईल, ही मानसिकता आयोजकांची असते.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Firecrackers seller issue in pune
First published on: 30-10-2016 at 04:22 IST