scorecardresearch

पुण्यात लष्कर भागातील फॅशन स्ट्रीट परिसरात गोळीबार

एकजण जखमी ; आरोपीला पकडण्यासाठी पोलीस पथक रवाना

firing
(संग्रहीत छायाचित्र)

लष्कर भागातील गजबजलेल्या फॅशन स्ट्रीट परिसरात एका व्यक्तीवर छऱ्याच्या बंदुकीतून गोळीबार करण्यात आल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. वैमनस्यातून ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. तौफिक अख्तर शेख (वय ४५, रा. भीमपुरा, लष्कर) असे जखमी झालेल्याचे नाव असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जुल्फिकार शेख नावाच्या एकाने तौफिक शेख यांच्यावर गोळीबार केल्याची माहिती प्राथमिक तपासात मिळाली आहे. आरोपी जुल्फिकारला पकडण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहे. रात्री उशीरा या प्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

तौफिक शेख आणि जुल्फिकार शेख यांचे फॅशन स्ट्रीट परिसरात व्यवसाय आहेत. तेथे दोन व्यापारी संघटना आहेत. गेल्या काही महिन्यांपासून तौफिक आणि जुल्फिकार यांच्यात वाद सुरू होते. मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास तौफिक फॅशन स्ट्रीट परिसरातील एका दुकानाजवळ थांबले होते. त्या वेळी जुल्फीकार तेथे आला आणि त्याने त्याच्याकडील छऱ्याच्या बंदुकीतून गोळीबार केला.

गोळीबार झाल्यानंतर फॅशन स्ट्रीट परिसरात घबराट उडाली. या घटनेची माहिती मिळताच लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी घटनास्थळी जाऊन तातडीने तपास सुरू केला. तेव्हा जुल्फिकारने गोळीबार केल्याची माहिती मिळाली.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 14-06-2022 at 21:50 IST