scorecardresearch

बालभारतीतर्फे देशातील पहिल्या पाठय़पुस्तक संग्रहालयाची निर्मिती

शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली बालभारतीची बैठक झाली.

पुणे :  राज्य पाठय़पुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाकडून (बालभारती) देशातील पहिल्या पाठय़पुस्तक संग्रहालयाची राज्यात निर्मिती करण्यात येणार आहे. या संग्रहालयात अनेक दुर्मीळ पाठय़पुस्तके अभ्यासासाठी उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच अकरावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी भूगोल या विषयासाठी प्रयोगवही दिली जाणार आहे. 

शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली बालभारतीची बैठक झाली. या बैठकीत संग्रहालयाच्या उभारणीचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत २०२२-२३ या वर्षांसाठी ४२९ कोटींच्या खर्चाच्या अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आली. त्यात पाठय़पुस्तक संग्रहालयासाठी ५ कोटींची तरतूद करण्यात आली. बालभारतीच्या ग्रंथालयात १८३७ पासूनची दुर्मीळ पुस्तके जपून ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे या संग्रहालायात या दुर्मीळ पुस्तकांची मांडणी करण्यात येईल. पाठय़पुस्तकांचा उद्देश, रचना, वैशिष्टय़, स्वरूप आणि इतिहास यांचा अभ्यास संग्रहालयाच्या माध्यमातून करणे शक्य होईल. या संग्रहालयासाठी देशातील अन्य राज्यातील पाठय़पुस्तकेही एकत्र करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.  आगामी वर्षांपासून अकरावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना भूगोल विषयासाठी प्रयोगवही (जर्नल) बालभारतीमार्फत उपलब्ध करून देण्याचाही निर्णय घेण्यात आला. या पूर्वी पर्यावरण शिक्षण, जलसुरक्षा, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि गणित या विषयांसाठी प्रयोगवह्या देण्यात आल्या आहेत. त्याच धर्तीवर भूगोल या विषयासाठीही प्रयोगवही उपलब्ध करून देण्याची मागणी अनेक शिक्षकांकडून सातत्याने करण्यात येत होती.

स्वतंत्र इमारत

पाठय़पुस्तकांच्या संग्रहालयासाठी स्वतंत्र इमारत असेल. त्यात संग्रहालय, पाठय़पुस्तकांचे डिजिटल प्रदर्शन, प्रेक्षागृह, सुसज्ज ग्रंथालय, कलादालन यांचा  समावेश असेल. तर, संग्रहालयात पाठय़पुस्तक निर्मितीची प्रक्रिया, पाठय़पुस्तकांच्या सूक्ष्म प्रतिकृती, पाठय़पुस्तकांचा प्रवास छायाचित्रांद्वारे मांडला जाईल, अशी माहिती बालभारतीतील अधिकाऱ्यांनी दिली.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: First textbook museum in the country by balbharati zws

ताज्या बातम्या