पिंपरी- चिंचवड: पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर नुकतंच साडेआठ कोटींचं रक्तचंदन जप्त करण्यात आलं होतं. या प्रकरणी राजाराम गंगाराम गायखे व हरप्रीतसिंग धरमसिंग बदाना या दोघांना अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर शिरगाव परंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हादेखील दाखल करण्यात आला होता. पोलिसांच्या पुढील तपासात आणखी तिघांची नावं समोर आलेली आहेत. त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. दक्षिण भारतातून आलेलं हे रक्तचंदन मुंबईमार्गे दुबईला जाणार होतं, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. परंतु, त्यापूर्वीच हे रक्तचंदन पोलिसांनी हस्तगत केलं. या प्रकरणात आणखी आरोपी असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्यांच्यापर्यंत पोहोचणं पोलिसांसाठी मोठं आव्हान असेल.
श्रीकांत शंकर भिलारे, इंद्रावन बाबाजी माने व दीपक पोपट साळवे यांना या गुन्ह्याप्रकरणी बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. आतापर्यंत या गुन्ह्यामध्ये पाच जणांना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी तीन जण मुख्य आरोपी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
२ मार्च रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरून रक्तचंदनाची तस्करी केली जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मालमत्ताविरोधी पथकाने तत्काळ उर्से टोल नाका येथे सापळा रचला. त्यामध्ये पुणे-बंगळुरू महामार्गावरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनर पोलिसांनी पकडला होता. नारळाच्या काथ्याखाली रक्तचंदन लपवून तस्करी केली जात होती. साडेआठ कोटींचं ११ टन रक्तचंदन पोलिसांनी जप्त केलं होतं. या प्रकरणी आतापर्यंत पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. नेमकं हे चंदन कुणाचं होतं? दुबई वा अन्य कुठे जाणार होतं? हे तपासातून अद्याप समोर आलेलं नाही.