पुणे: शहराचा वाढता विस्तार लक्षात घेऊन शहरात पाच नवीन ठिकाणी अग्निशमन केंद्र प्रस्तावित करण्यात आली आहेत. तसेच अग्निशमन दलाच्या सक्षमीकरणालाही प्राधान्य देण्यात आले आहे.धायरी, बावधन, खराडी, बाणेर आणि महंमदवाडी येथे केद्रांची उभारणी करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांनी अंदाजपत्रक सादर करताना दिली. या केंद्रांना मनुष्यबळही उपलब्ध करून दिले जाणार आहे. शहराचा विस्तार वाढला आहे. समाविष्ट गावांच्या समावेशामुळे भौगोलिक क्षेत्र वाढले आहे. त्या तुलनेत अग्निशमन केंद्रांची संख्या अपुरी आहे. त्यामुळे अग्निशमन केंद्रांची संख्या वाढविण्याला अंदाजपत्रकात प्राधान्य देण्यात आले आहे. महापालिकेच्या भवन रचना विभागाकडून ही काम केली जाणार असून लोहियानगर येथील मुख्य अग्निशमन केंद्राच्या इमारतीचेही नूतनीकरण करण्यात येणार आहे. हेही वाचा >>>पुणे: भाडेकराराने घरे योजना महापालिकेने शहराच्या काही भागात उंच इमारती उभारण्यास परवानगी दिली आहे. ही बाब लक्षात घेऊन अग्निशमन दलासाठी अत्याधुनिक यंत्र आणि वाहनांच्या, शिड्यांच्या खरेदीलाही प्राधान्य देण्यात आले आहे. अग्निशमन दलासाठी चार हायराईज फायर फायटिंग वाहने खरेदी करण्यात येणार असून त्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. याशिवाय खास निधीतून हॅजमॅट रेस्क्यू वाहने, फायर फायटिंग ॲण्ड रेस्क्सू वाहने (२४ मीटर उंच शिडीसह) असा अत्याधुनिक ताफा अग्निशमन दलाला उपलब्ध करून देण्यात येणार आहे.