पुणे : मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर रसायन घेऊन निघालेल्या भरधाव टँकरने वाहनांना धडक दिल्याची घटना शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास घडली. अपघातात पाचजण मृत्युमुखी पडले असून तेराजण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे तसेच जखमींची नावे रात्री उशिरापर्यंत समजू शकली नाहीत.

अपघातामुळे बाह्यवळण मार्गावरील नवले पूल परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली. पोलिसांकडून अपघातग्रस्त वाहने बाजूला काढण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. नवले पूल परिसरातून रात्री नऊच्या सुमारास  रसायनाचा (थिनर) टँकर पुण्याकडे निघाला होता. त्या वेळी भरधाव टँकरवरचे नियंत्रण सुटले आणि तो एका अवजड कंटेनरवर आदळला. नंतर तो अन्य वाहनांवर आदळला. अपघात झाल्याची माहिती मिळताच सिंहगड पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास घेवारे तसेच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले.

अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. वाहनांखाली अडकलेल्या जखमींना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातात पाचजण मृत्युमुखी पडले असून बारा ते तेराजण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. अपघात झाल्यानंतर बाह्यवळण मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या सहाय्याने बाजूला काढण्याचे काम सुरू होते. गुरूवारी ( २१ ऑक्टोबर ) नवले पूल परिसरात भरधाव वाहनाच्या धडकेने दुचाकीवरील दोन महिलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.