पुणे : हडपसर भागात वैमनस्यातून एका तरुणाचा पाठलाग करून देशी बनावटीच्या पिस्तुलातून गोळीबार करणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी गजाआड केले. आरोपींनी केलेल्या गोळीबारात नेम चुकल्याने त्यांचाच साथीदार जखमी झाल्याची घटना नुकतीच घडली होती. याप्रकरणी सुमीत ऊर्फ विलास दत्ता खवळे (वय २०, रा. सातववाडी, सासवड रस्ता, हडपसर), साहिल बाबूराव जगताप (वय २०, रा. जाई मंगल कार्यालयासमोर, मांजरी, हडपसर), बसवराज विजय सुतार (वय २४, रा. केशवनगर ग्रामपंचायतजवळ, मुंढवा), वैभव श्रावण गवळी (वय २२, रा. केशवनगर, मुंढवा), सचिन गंगाराम रेनके (वय ३५, रा. इंदिरानगर, शिरूर) यांना अटक करण्यात आली.

मांजरी भागात वैमनस्यातून एका तरुणाचा पाठलाग करून त्याच्यावर पिस्तुलातून गोळीबार करण्यात आल्याची घटना २९ मे रोजी घडली होती. आरोपी खवळे याने प्रतिस्पर्धी टोळीतील तरुणावर पिस्तुलातून गोळी झाडली. मात्र, त्या वेळी त्याचा नेम चुकल्याने खवळेचा साथीदार वैभव गवळी जखमी झाला होता. आरोपींनी गोळीबार करून दहशत माजविल्याप्रकरणी हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. जखमी झालेल्या गवळीवर ससून रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर त्याच्याबरोबर असलेले साथीदार खवळे, जगताप, सुतार यांना पकडण्यात आले. पोलीस तपासात आरोपींनी गोळीबार करण्यासाठी वापरलेले पिस्तूल शिरूरमधील सचिन रेनके याच्याकडून घेतल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी रेनके याला ताब्यात घेतले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे, सहायक आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, गुन्हे शाखेचे निरीक्षक नीलेश जगदाळे, उपनिरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, अविनाश गोसावी, दीपक कांबळे, अमित साखरे, नीलेश किरवे, बापू लोणकर, अमोल दणके, अजित मदने यांनी ही कामगिरी केली.