scorecardresearch

उन्हाळ्यात शेतीसाठी दोन आवर्तने, ‘जलसंपदा’ विभागाची ठाम भूमिका

कडक उन्हामुळे पाण्याचे होणारे बाष्पीभवन या पार्श्वभूमीवर शहराला एप्रिल महिन्यापासून पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

irrigation farming
(फोटो सौजन्य- संग्रहित छायाचित्र, लोकसत्ता)

लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: गेल्या वर्षी पावसाळा संपल्यानंतर धरणांमधील पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार उन्हाळ्यात ग्रामीण भागासाठी दोन सिंचन आवर्तने निश्चित केली आहेत. त्यानुसार दोन टप्प्यांत पाणी सोडण्यात येणार आहे, असे जलसंपदा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे उन्हाच्या वाढत्या झळा, पाण्याची वाढलेली मागणी, धरणातील कमी होत असलेला पाणीसाठा आणि कडक उन्हामुळे पाण्याचे होणारे बाष्पीभवन या पार्श्वभूमीवर शहराला एप्रिल महिन्यापासून पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांत सध्या १५.९२ अब्ज घनफूट (टीएमसी) एवढा पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी २२ मार्च रोजी चारही धरणांत १५.६८ टीएमसी एवढा पाणीसाठा होता. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत थोडासा पाणीसाठा जास्त आहे. मात्र, यंदा मोसमी पावसाचे आगमन विलंबाने होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे पाण्याचे नियोजन करताना महापालिका प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

आणखी वाचा- व्हिडीओ ‘लाइक’ केला अन् संगणक अभियंता तरुणीची झाली २२ लाखांची फसवणूक

दरम्यान, खडकवासला धरणातून गेल्या वर्षी २५ डिसेंबरपासून रब्बी हंगामासाठी नवीन मुठा उजवा कालव्यातून सुरू केलेले सिंचन आवर्तन ६ फेब्रुवारीपर्यंत सुरू होते. या काळात ग्रामीण भागासाठी ३.८१ टीएमसी पाणी देण्यात आले. त्यानंतर पहिले उन्हाळी आवर्तन १ मार्चपासून सुरू करण्यात आले असून, ते एकूण ५५ दिवस सुरू राहणार आहे. या कालावधीत पाच टीएमसी पाणी सिंचनासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यानंतर धरणांमधील उपलब्ध पाणीसाठा पाहून दुसरे उन्हाळी आवर्तन दिले जाणार असल्याचे खडकवासला पाटबंधारे प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

यंदा १५ ऑगस्टपर्यंतचे नियोजन

दरवर्षी धरणांमधील उपलब्ध पाणी ३० जुलैपर्यंत पुरेल, या पद्धतीने नियोजन केले जाते. मात्र, यंदा मोसमी पावसाचे आगमन विलंबाने होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे ३० जुलैऐवजी १५ ऑगस्टपर्यंत धरणांमधील पाण्याचे नियोजन करण्याचे जलसंपदा आणि महापालिका प्रशासनाच्या बैठकीत निश्चित करण्यात आले आहे.

दुसरे उन्हाळी आवर्तन शक्य

शहरासाठी दरमहा सव्वा ते दीड टीएमसी पाणी महापालिका धरणातून उचलते. त्यानुसार सध्या उपलब्ध असलेल्या पाच ते सव्वा पाच टीएमसी पाणी महापालिकेला मिळू शकणार आहे. ग्रामीण भागासाठी सध्या पहिले उन्हाळी आवर्तन सुरू असून दुसऱ्या आवर्तनासाठी देखील पाणीचोरी, गळती, बाष्पीभवन लक्षात घेऊन पाणी शिल्लक राहू शकेल, असा विश्वासही जलसंपदा विभागाकडून व्यक्त करण्यात आला. याबाबतचा निर्णय लवकरच होणाऱ्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत होणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-03-2023 at 18:56 IST

संबंधित बातम्या