इंदापूर : उजनी धरणाच्या परिसरात स्थलांतरित रोहित (फ्लेमिंगो) पक्ष्यांचे आगमन यंंदा लांबणीवर पडले आहे. धरणातून पाणी सोडून साठा सुमारे पंच्याहत्तर टक्क्यांवर आला असून, किनारी दलदली आणि उथळ पट्टे खुले झाले आहेत. मात्र, जलाशयाकडे रोहित पक्ष्यांनी पाठ फिरवली असल्याने निदर्शनास आले आहे. पाण्याची गुणवत्ता आणि अन्नसाखळीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने रोहित पक्षी अद्याप उजनीच्या जलाशयावर आले नसल्याचे निरीक्षण पक्षीतज्ज्ञांनी नोंदवले आहे.
स्थलांतरित पक्ष्यांचे आश्रयस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उजनी धरण परिसरात दरवर्षी ऑक्टोबर अखेरीस रोहितांचे आगमन सुरू होते. युरोप खंड, तसेच गुजरातमधील कच्छचे रण परिसरातून हजारो किलोमीटरचा प्रवास करून येणारे हे पक्षी उजनीतील कुंभारगाव, डाळज, पळसदेव, भिगवण, काळेवाडी या भागात दरवर्षी हंगामी मुक्काम करतात. उथळ पाण्यात वाढणारे सूक्ष्म जलचर, तांबडे शैवाल आणि दलदलीतील जीवसृष्टी हा त्यांच्या अन्नसाखळीचा पाया आहे.
यंदा मे पासून दीर्घकाळ पाऊस झाल्याने जुलैमध्येच धरण शंभर टक्के भरले. परिणामी किनारी उथळ भाग खोल पाण्यात गेले. त्या वेळी रोहित पक्ष्यांच्या आगमनास विलंब होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. सध्या सिंचनासाठी पाणी सोडल्याने साठा कमी झाला असून अनेक ठिकाणी पाणथळ भाग पुन्हा उघड झाले आहेत. तरीही दरवर्षी येणारे रोहित पक्ष्यांचे थवे उतरले नसल्याचे दिसून येत आहे.
केवळ पाण्याची पातळी हा एकमेव घटक नसून पाण्याची गुणवत्ता अधिक महत्त्वाची ठरते. भिमा खोऱ्यातून येणारे सांडपाणी, शेतीतील रासायनिक अवशेष आणि औद्योगिक प्रदूषण यामुळे जलाशयातील पोषकद्रव्यांचे संतुलन बदलते. त्याचा परिणाम तांबड्या शैवालांच्या वाढीवर होऊ शकतो. शैवालांची वाढ खुंटल्यास रोहितांना आवश्यक खाद्य मिळत नाही. अन्नटंचाईची शक्यता निर्माण झाल्यास हे स्थलांतरित पक्षी पर्यायी जलक्षेत्राचा पर्याय निवडतात. तसेच हवामान बदलाचाही प्रभाव नाकारता येत नसल्याचे पक्षी अभ्यासक डॉ. अरविंद कुंभार यांनी सांगितले.
उजनीवरील रोहितांचे आगमन हे केवळ निसर्गसौंदर्याचा भाग नसून परिसंस्थेच्या आरोग्याचे द्योतक मानले जाते. शैवाल, सूक्ष्म जलचर, मासे आणि त्यावर अवलंबून असलेले पक्षी या सर्वांची परस्परावलंबी साखळी अबाधित राहणे आवश्यक आहे. त्यातील एका घटकावर परिणाम झाला तर संपूर्ण संतुलन बिघडू शकते. जलाशयातील सांडपाणी व्यवस्थापन, औद्योगिक प्रदूषणावर नियंत्रण आणि पाणथळ भागांचे संवर्धन यासाठी दीर्घकालीन आराखडा आवश्यक आहे. पाण्याची गुणवत्ता नियमित तपासणी आणि जैवविविधतेचा अभ्यास याकडेही लक्ष देणे गरजेचे ठरणार आहे. रोहितांचे आगमन अद्याप झाले नसून, आगामी काळातही ते येण्याची शक्यता आता मावळली असल्याचे डॉ. कुंभार यांनी स्पष्ट केले.
पाण्याची पातळी अनुकूल असतानाही रोहित पक्ष्यांचे आगमन झालेले नाही. त्यामुळे पाण्याची गुणवत्ता आणि अन्नसाखळी यांचा सखोल विचार करावा लागेल. प्रदूषणामुळे तांबड्या शैवालांची वाढ बाधित होत असेल, तर या पक्ष्यांना आवश्यक खाद्य मिळत नाही. हा परिसंस्थेसाठी धोक्याचा इशारा आहे. – डॉ. अरविंद कुंभार, पक्षी अभ्यासक
