उच्च न्यायालयाचे आदेश धाब्यावर बसवत शहरात पुन्हा एकदा विविध संघटना, पक्ष यांच्या कार्यकर्त्यांची फ्लेक्सबाजी सुरू आहे. शहरातील प्रमुख रस्ते, चौक या ठिकाणी लागलेले नेत्यांच्या अभिनंदनाचे फ्लेक्स अद्यापही तसेच आहेत. शहरात नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये तर नगरसेवकांच्या घरगुती कार्यक्रमांचे फ्लेक्सही अगदी झोकात उभे आहेत.
शहरांमध्ये फ्लेक्स लावण्यावर उच्च न्यायालयाने बंदी घातली. त्यानुसार अगदी सुरुवातीला महानगरपालिकांनी कारवाई केलीही. मात्र, आता पुन्हा एकदा शहरातील अनेक भागांमध्ये फ्लेक्स उभे आहेत. नेत्यांना मंत्रिपद मिळाले म्हणून, विधानसभा निवडणुकीत विजय मिळाला म्हणून नेत्यांचे अभिनंदन करण्यासाठी लावण्यात आलेल्या फ्लेक्सवर दोन महिने हेऊनही कारवाई झालेली नाही. परिसरातील एखाद्या गावाचे उपसरपंचपद मिळाल्याबद्दल अभिनंदन करणारे फ्लेक्सही शहरात लावण्यात आले आहेत. या शिवाय नगरसेवकांनी आयोजित केलेले उपक्रम, स्पर्धा यांचेही फ्लेक्स दिसत आहेत. नुकत्याच झालेल्या सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करणारे फ्लेक्सही काही ठिकाणी उभे आहेत. या सगळ्याबरोबरच काही जीम, हॉटेल्स यांनीही होर्डिग्जचा खर्च करण्याऐवजी छोटे फ्लेक्स उभारण्याचाच पर्याय स्वीकारला आहे. मात्र, या कुणावरही कारवाई झालेली नाही.
कर्वे रस्ता, सिंहगड रस्ता, शास्त्री रस्ता, पर्वती भाग आणि पुण्याच्या जवळील नव्याने शहरात आलेली गावे या ठिकाणी ही सर्रास फ्लेक्स लावलेले दिसतात. शहरातील नव्याने विकसित झालेल्या भागातील नगरसेवकांच्या घरातील कार्यक्रमांची निमंत्रणे, एक वर्षांच्या मुलाचा वाढदिवस, जवळच्याचे निधन झाले असल्यास त्याला श्रद्धांजली, सणाच्या शुभेच्छा, नव्या वर्षांच्या शुभेच्छा अशा कोणत्याही विषयांचे फ्लेक्स उभारण्यात आले आहेत. रस्त्यावरील दिव्यांचे खांब, झाड यांना छोटे फ्लेक्स लावलेले जागोजागी दिसून येतात. काही ठिकाणी अधिकृत होर्डिगच्या खालीच अभिनंदनाचे फलक उभारण्यात आले आहेत. अधिकृत होर्डिग कोणते आणि अनधिकृत कोणते यांबाबतही गोंधळ व्हावा, अशा प्रकारे हे फलक उभारण्यात येत आहेत. महिनोंमहिने उभ्या असलेल्या या फलकांवर मनपाही कारवाई करत नाही आणि कार्यकर्तेही ते उतरवत नाहीत.