scorecardresearch

पुण्यात उडत्या बसेसची योजना! वाहतुकीच्या समस्येवर गडकरींचा रामबाण उपाय!

पुण्यातील वाहतुकीच्या समस्येवर ट्रॉली बस आणि उडत्या बसचा पर्याय!

flying bus in pune nitin gadkari airbus
पुण्यातल्या ट्रॅफिकच्या समस्येवर गडकरींचा रामबाण उपाय!

वाहतुकीची समस्या हा सध्या प्रत्येक मोठ्या शहरातला गंभीर प्रश्न ठरला आहे. या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी सर्वच महानगर पालिका आणि स्थानिक प्रशासन प्रयत्न करत असताना पुण्याच्या वाहतुकीच्या समस्येवर केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी भन्नाट उपाय सांगितला आहे. पुण्यात उडत्या बसेसची योजना आणली, तर पुण्यातल्या वाहतुकीची समस्या कमी होण्यास फायदा होईल, असं गडकरी म्हणाले आहेत. चांदणी चौकातील वाहतूक समस्या आणि इतर मुद्द्यांवर पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना गडकरींनी पुण्यातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी नव्या योजनांवर काम सुरू असल्याचं सांगितलं. यावेळी त्यांनी उडत्या बसेसचा उल्लेख केला.

चार मजली रस्त्यांची योजना!

पुण्यातील सातारा रस्त्यावर होणारं ट्राफिक कमी करण्यासाठी चार मजली रस्त्यांची योजना राबवणार असल्याचं गडकरी म्हणाले. “सातारा रोडवर एलिव्हेटेड रोज बांधण्याची योजना आहे. म्हणजे खाली रस्ता, त्यावर दोन उड्डाणपूल आणि त्याच्यावर मेट्रो-वगैरे सारखी मास रॅपिड ट्रान्सपोर्टची व्यवस्था असेल. त्यासंदर्भात अभ्यास करायला मी सांगितलं आहे”, असं गडकरी म्हणाले.

पुणे-बंगळुर फक्त साडेतीन तासांत!

दरम्यान, यावेळी बोलताना नितीन गडकरींनी पुणे-बंगळुर ग्रीनफील्ड महामार्गाबाबत माहिती दिली. “पुणे-बंगळुर ग्रीनफील्ड महामार्ग आम्ही उरसे नाक्यावरून सुरू करणार आहोत. त्यामुळे मुंबईकडून बंगळुरकडे जाणारी वाहतुक तिथूनच वळून जाईल. त्यामुळे मुंबई ते बंगळुर साडेचार तासांत आणि पुणे ते बंगळुर हा प्रवास साडेतीन किंवा सव्वातीन तासांत पूर्ण होईल. हा पश्चिम महाराष्ट्रातल्या दुष्काळी भागातून जाणारा रस्ता आहे. त्या भागाचा विकास होण्यासाठी या महामार्गाचा फायदा होईल”, असं गडकरी म्हणाले.

पाहा व्हिडीओ –

VIDEO: “अधिकाऱ्यांनी फक्त ‘येस सर’ म्हणायचं आणि…”, नितीन गडकरी यांचं नागपुरात वक्तव्य

उडती बस आणि ट्रॉली बस!

“आम्ही १६५ रोप वे केबल कार बांधतोय. आमच्याकडे हवेत उडणारी बस आहे. त्यात १५० लोक बसतात आणि ती वरच्यावर जाते. ती डॉफल मेअरची आहे. त्यासाठी आमच्याकडे पैसे आहेत. वरच्यावरून वाहतूक गेली, तर त्याचा फायदा होईल. त्यासोबतच ट्रॉली बसचा एक पर्याय आहे. त्यात दोन बस जोडल्या जातात आणि ती इलेक्ट्रिक केबलवर चालते. इलेक्ट्रिक बसची किंमत सव्वाकोटी आहे. तेवढ्याच क्षमतेच्या या ट्रॉलीबसची किंमत ६० लाख आहे. त्यामुळे भांडवल गुंतवणूक कमी आहे. पुणे पालिकेनं अशी काही योजना तयार केली, तर आम्ही त्यासाठी पैसे देऊ शकतो”, असं नितीन गडकरींनी यावेळी जाहीर केलं.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-09-2022 at 13:03 IST
ताज्या बातम्या