रस्ता रुंदीकरण न झाल्याचा फटका

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील  बहुमजली उड्डाणपुलाचे काम महापालिकेकडून रस्ता रूंदीकरण न झाल्याने रखडल्याचे स्पष्ट झाले आहे. महापालिकेच्या विकास आराखडय़ानुसार गणेशिखड रस्त्याचे आधी रुंदीकरण करावे, अशी भूमिका पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने घेतली आहे. मात्र महापालिका प्रशासनाकडून त्याबाबत निष्क्रियता दाखविली जात असल्याने उड्डाणपुलाचे काम सुरू होण्यास विलंब होणार आहे.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) प्रस्तावित हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेसाठी विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल करोना संसर्गाच्या टाळेबंदी कालावधीत पाडण्यात आला. या ठिकाणी प्रस्तावित मेट्रो मार्गिकेसह अन्य वाहनांसाठी बहुमजली उड्डाणपूल बांधण्याबरोबरच गणेशिखड रस्ता परिसरात वाहतूक सुधारणा करण्याचे निश्चित करण्यात आले.

जून महिन्यात उड्डाणपुलाचे पाडकाम करण्यात आले. त्यानंतर अद्यापही उड्डाणपुलाचे काम सुरू झालेले नाही.  उड्डाणपुलाच्या कामामुळे गणेशिखड रस्त्यावर होणारी वाहतुकीची कोंडी लक्षात घेऊन काही उपाययोजना आणि वाहतूक सुधारणा करण्याचे निश्चित करण्यात आले. वाहतूक सुधारणेच्या या प्रस्तावित आराखडय़ाला विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

महापालिकेच्या विकास आराखडय़ात गणेशिखड रस्त्याची रुंदी ४५ मीटर दर्शविण्यात आली आहे. सध्या अस्तित्वातील रस्ता पादचारी मार्गासह ३६ मीटर रुंदीचा आहे. दुमजली उड्डाणपुलाचे बांधकाम करताना  विद्यापीठ चौकापासून सेनापती बापट रस्त्यापर्यंत ११ मीटर रुंदीचे बॅरीकेडस् लावावे लागणार आहेत. तसेच सेनापती बापट चौक ते शिवाजीनगर या दरम्यान ९ मीटर रुंदीचे बॅरीकेडस् लावण्यात येणार आहेत. गणेशिखड रस्त्यावरील वाहतुकीचा ताण पहाता बॅरीकेडस् लावल्यानंतर वाहतुकीसाठी कमी जागा उपलब्ध राहणार आहे.

या पार्श्वभूमी वर गणेशिखड रस्त्याचे रुंदीकरण महापालिकेने विकास आराखडय़ानुसार करावे, असे पत्र पीएमआरडीएने महापालिकेला दिले आहे. रस्ता रुंदीकरण झाले नाही तर प्रस्तावित मेट्रो मार्गिकेचे कामही सुरू करण्यास अडचण येणार आहे, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. मात्र महापालिकेकडून रुंदीकरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे विद्यापीठ चौकातील प्रस्तावित दुमजली उड्डाणपुलाचे काम विलंबाने सुरू होण्याची किंवा ते दीर्घकाळ रखडण्याची भीती निर्माण झाली आहे.

महापालिकेची भूमिका

पुणे महानगर एकीकृत परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत वाहतूक सुधारणा आराखडय़ाला मान्यता देण्यात आली आहे. या मार्गावरील वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी पुणे विद्यापीठ चौक ते सेनापती बापट चौक या अंदाजे २५० मीटर लांबीच्या भागात रस्ता रुंदीकरण करावे लागणार आहे. रुंदीकरणासाठी आवश्यक असलेल्या जागेचे संपादन करावे लागणार आहे. रुंदीकरणासाठी लागणारी जागा सरकारी आहे. पीएमआरडीए ही सरकारी संस्था आहे. त्यामुळे या जागेचे संपादन त्यांनीच करावे, अशी भूमिका महापालिकेने घेतली आहे. मात्र महापालिकेची जबाबदारी असतानाही त्यासाठी टाळाटाळ होत असल्याचा फटका शेकडो वाहनचालकांना बसणार आहे.

‘पीएमआरडीए’चा दावा

अडीचशे मीटर लांबीच्या रस्ता रुंदीकरणामध्ये केंद्र आणि राज्य शासकीय संस्था आहेत. त्या जागेचे संपादन करावे, या ठिकाणच्या सेवा वाहिन्या स्थलांतरीत कराव्यात, असे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले आहेत. त्यामुळे भूसंपादन आणि रुंदीकरणाची जबाबदारी महापालिकेची आहे, असा दावा पीएमआरडीएकडून करण्यात आला आहे.