“मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षासाठी आता नवीन दिशा ठरवली आहे. ते पुन्हा चांगल्या प्रकारे काम करतील,” अशी भूमिका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मांडली. पुण्यात आयोजित एका कार्यक्रमापूर्वी त्या बोलत होता. मनसेच्या नव्या झेंड्याबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना राज ठाकरे चांगलं काम करतील असं त्या म्हणाल्या. माझ्यासारख्या शिवसैनिकाला खरा नेता पाहण्याची आणि त्यांना फॉलो करण्याची खूप इच्छा असते. आता आपल्याला खऱ्या नेत्यांची गरज आहे, असं त्या यावेळी म्हणाल्या.

मुंबईतील नाईट लाईफबद्दल अमृता फडणवीस यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, “नाईट लाईफविषयी अजून काही विचार केलेला नाही. यात सुरक्षेचा प्रश्न कसा हाताळला जाईल हे पाहणं आवश्यक आहे.” “महिला दिवस-रात्र येथे काम करतात. महिलांसाठी मुंबई सुरक्षित आहे. त्यामुळे मुंबईचा मला अभिमान वाटतो. मुबंईसारखे अनुकरण दुसऱ्या शहरांनीदेखील करावं,” असंही त्यांनी नमूद केलं,

राष्ट्रवादीचे पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. यावरही त्यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना त्या म्हणाल्या की, “याबाबत मला काही माहिती नसून सत्यतता पडताळावी लागले. शरद पवार यांची सुरक्षा काढून घेतल्याबाबत अफवा पसरवली जात असावी. यामध्ये काही तथ्य नसेल असे वाटते. परंतु यावर मी काहीही बोलणार नाही.”

भाजपा सरकारच्या काळात विरोधी पक्षांच्या नेत्याचे फोन टॅप केले गेले आहेत, या आरोपांवरही त्यांनी भाष्य केलं. “तीनही पक्षांना भाजपा नकोय. त्यामुळे ते भाजपवर खोटे आरोप करत आहेत आणि अगोदरच्या सरकारमध्ये शिवसेनादेखील सामिल होती. त्यामुळे याची चौकशी झाली तरी चालेल,” असंही त्या म्हणाल्या.