पुणे : गेल्या काही दिवसांपासून अन्न व औषध प्रशासनाने खाद्यपदार्थांच्या भेसळीविरुद्ध जे छापासत्र सुरू केले आहे, त्यातून भेसळीच्या बाजाराचा धक्कादायक चेहरा समोर आला. या पार्श्वभूमीवर या क्षेत्रातील जाणकारांनी आता ‘जागो ग्राहक जागो’ म्हणत ग्राहकांना सजग राहण्याचे आवाहन केले आहे. कोल्हापूर विद्यापीठाच्या अन्न तंत्रज्ञान विभागातील संशोधिका आणि प्राध्यापिका करिष्मा कांबळे यांनी काही पदार्थांमध्ये भेसळ नेमकी कशी होऊ शकते आणि ती कशी ओळखावी, याबाबत ‘लोकसत्ता’ला सांगितले.

कांबळे म्हणाल्या, ‘हळद पावडरमध्ये बऱ्याचदा पिवळा खडू आणि स्टार्च वापरून भेसळ केली जाते. भेसळीची हळद ही गडद पिवळी दिसते. मधामध्ये बऱ्याचदा साखरेचा पाक मिसळला जातो. चमचाभर मध पाण्यात टाकल्यास पाकयुक्त मध लगेच पाण्यात विरघळतो, तर अस्सल मध तळाशी स्थिर राहतो. खोबरेल तेलात अनेकदा इतर कच्च्या तेलांची भेसळ केली जाते. खोबरेल तेल काही काळ थंड वातावरणात ठेवल्यास ते घट्ट जमून येते, तर भेसळीच्या खोबरेल तेलाला पापुद्रे सुटतात. लाल मिरची पावडरमध्ये विटांचा चुरा मिसळल्याची शक्यता असते. मिरची पावडर पाण्यात टाकली असता हा चुरा तळाशी राहतो. हिंगामध्येही खडूची भुकटी मिसळली गेल्याची शक्यता असते. भेसळयुक्त हिंग पाण्यात टाकल्यावर स्फटिके लगेच तरंगतात. धने पावडरीमध्ये लाकडाचा भुसा भेसळ म्हणून वापरल्याची शक्यता असते.’
‘अखाद्य रंगांचा बेसुमार वापर’

‘डाळी आकर्षक दिसाव्यात, यासाठी अनेकदा अखाद्य रंग वापरले जातात. या डाळी पाण्यात स्वच्छ धुताना फेस आल्यास समजावे, की यांच्यावर अखाद्य रंग आवश्यकतेपेक्षा अधिक वापरलेला आहे. याशिवाय, विलायची, बडीशेप यांनाही अखाद्य रंग वापरला जातो. अधिक हिरवीगार बडीशेप असेल, तर लगेच ओळखावे, की तिला रंग दिलेला आहे. गावरान बडीशेप ही काळपट फिकट हिरव्या रंगाची असते,’ असे प्रा. कांबळे म्हणाल्या.
ग्राहक स्वयंसेवी संस्थांच्या सर्वेक्षणातील निरीक्षणे

ग्राहकांच्या हितासाठी लढणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील ‘कन्झ्युमर गायडन्स सोसायटी ऑफ इंडिया’ आणि ‘व्हॉईस ऑफ सिटिझन्स’ यांनी दूध भेसळीविषयी एक अहवाल तयार केला आहे. त्यानुसार उघड्यावर मिळणाऱ्या दुधापैकी ७४ ते ७८ टक्के दुधात भेसळ असून, त्यामध्ये युरिया, स्टार्च मिसळल्याचे उघडकीस आले. तर, बंद पाकिटातील दुधात जवळपास २० टक्के पाण्याचे प्रमाण आढळून आले. ‘समर्थ भारत’ आणि स्थानिक ग्राहक पंचायत यांनी पुणे आणि कोल्हापूर भागात केलेल्या सर्वेक्षणानुसार माव्यामध्ये ४० टक्के भेसळ आढळली. त्यासाठी डालडा, बटाटा, स्टार्चचा वापर करण्यात आला होता.

गूळनिर्मिती प्रक्रियेत उसाच्या रसातील मळी (कचरा) काढण्यासाठी ६० ‘पीएम’ या मर्यादेत ‘हायड्रोसल्फाइट’ अर्थात हायड्रोस मिसळण्यास सरकारची परवानगी आहे, परंतु, आपल्याकडे आता दोनशे, अडीचशे ‘पीएम’हून अधिक ‘हायड्रोस’ मिसळला जातो. उत्तर प्रदेशमधील काही व्यापाऱ्यांकडून त्यात सल्फोलाइट हे प्रतिबंधित रसायन वापरण्याची शक्यता राहते. हे रसायन आरोग्याला हानिकारक आहे. त्यामुळे गुळाचा मूळ आयुर्वेदिक गुणधर्म नष्ट होतो. अशांवर कारवाई होणे गरजेचे आहे. – मोहन ओसवाल, माजी अध्यक्ष, पूना मर्चंट चेंबर

भेसळीच्या अन्नपदार्थांचे शरीरावर दूरगामी परिणाम होतात. या अन्नपदार्थांमध्ये वाजवीपेक्षा जास्त वापरण्यात येणाऱ्या रासायनिक पदार्थांमुळे शरीराला अपाय होतो. त्यामुळे यकृत, किडनी, हृदयासारख्या महत्त्वाच्या अवयवांवर परिणाम होतो. दोन-चार वर्षांत यकृतावर सूज येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे भेसळीच्या पदार्थांपासून दूर राहणेच शहाणपणाचे आहे. – डॉ. अनिकेत जोशी, जनरल फिजिशियन

भेसळीचे प्रकार पूर्णपणे थांबणार नाहीत. त्यामुळे ग्राहकांनी सजग होण्याची गरज आहे. यासाठी ‘फूड सेफ्टी कनेक्ट ॲप’ अन्न व औषध विभागाने विकसित केले आहे. त्यावर ग्राहक तक्रार नोंदवू शकतात. या माध्यमातून छायाचित्र, व्हिडिओदेखील पाठवता येतो. –सय्यद इम्रान हाश्मी, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, पुणे