महागडी मोटार व तिला तितकाच ‘महाग’ अर्थात आकर्षक नोंदणी क्रमांक मिळविण्यासाठी ‘होऊ दे खर्च’ म्हणणाऱ्या पुणेकरांची संख्या आता चांगलीच वाढली आहे. पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून लिलाव करून आकर्षक वाहन नोंदणी क्रमांक देण्याची योजना सुरू झाल्यापासून पुणेकरांनी या क्रमांकासाठी सुमारे ऐंशी कोटींचा खर्च केला आहे. चारचाकी व दुचाकी मिळून आजपर्यंत जवळपास ९५ हजार वाहन मालकांनी आकर्षक क्रमांक घेतले आहेत.
प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून वाहनांना देण्यात येणाऱ्या नोंदणी क्रमांकासाठी पूर्वी लिलावाची पद्धत नव्हती. त्या वेळीही या क्रमांकांची आवड होतीच, पण बहुतांश वेळा बडय़ा ओळखीवरच हे क्रमांक मिळत असल्याचे चित्र होते. ‘आरटीओ’च्या कामकाजाशी संबंधित असणाऱ्या व्यक्ती, काही राजकीय मंडळी किंवा अधिकारी यांच्याकडे हे आकर्षक क्रमांक प्रमुख्याने दिसून येत होते. त्यासाठी नेहमीचेच शुल्क आकारले जात होते. मात्र, आकर्षक क्रमांकाच्या या व्यवहारात मधल्यांचेच हात ओले होत होते. त्यातून परिवहन विभागाला कोणताही जादाचा महसूल मिळत नव्हता. त्यामुळे असे आकर्षक क्रमांक अधिकृतरीत्या ठराविक किमतीला विकण्याचा निर्णय घेऊन २००४-२००५ या आर्थिक वर्षांपासून त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली.
सद्यस्थितीमध्ये मोटारींच्या आकर्षक क्रमांकासाठी लिलाव केला जातो. जो वाहन मालक जास्त रक्कम देईल, त्याला तो क्रमांक दिला जातो. ११११ या क्रमांकाला सर्वाधिक मागणी असते. त्यामुळे त्याची विक्री जवळपास चार लाखांपर्यंतही होते. त्यापाठोपाठ तीन लाख, दीड लाख, एक लाख ते १५ हजारांपर्यंतही आकर्षक क्रमांकाची विक्री केली जाते. पूर्वी केवळ चारचाकी मोटारींना असे क्रमांक घेतले जात होते. मात्र, आलीकडे बुलेट तसेच इतर महागडय़ा दुचाकी घेण्याकडे मोठय़ा प्रमाणावर कल असल्याने प्रामुख्याने या दुचाकींना आकर्षक क्रमांक घेतले जात आहेत.
आकर्षक क्रमांक घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते आहे. २००८-२००९ मध्ये केवळ आठच चारचाकी वाहनांसाठी आकर्षक क्रमांक घेण्यात आले होते. मागील वर्षी ही संख्या एक हजार ३१२ पर्यंत गेली. या आर्थिक वर्षांत जानेवारीपर्यंत १ हजार ८१ चारचाकी वाहन मालकांनी आकर्षक क्रमांक घेतले. दुचाकीबाबतही हीच परिस्थिती आहे. २००४-२००५ या आर्थिक वर्षांमध्ये १ हजार ६९ दुचाकी मालकांनी आकर्षक क्रमांक घेतले होते. मागील वर्षी ही संख्या १७ हजार ६६३ वर गेली. त्यामुळे आकर्षक क्रमांक मिळविणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसते आहे.