परदेशी विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी पुण्यालाच पसंती

शिक्षणाचे माहेरघर आणि ‘ऑक्सफर्ड ऑफ द इस्ट’ असा गौरव प्राप्त झालेल्या पुण्यालाच परदेशी विद्यार्थी आपल्या शिक्षणसाठी पसंती देत आहेत.

शिक्षणाचे माहेरघर आणि ‘ऑक्सफर्ड ऑफ द इस्ट’ असा गौरव प्राप्त झालेल्या पुण्यालाच परदेशी विद्यार्थी आपल्या शिक्षणसाठी पसंती देत आहेत. ‘इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स’च्या माध्यमातून (आयसीसीआर) तीन हजार शिष्यवृत्तीधारक परदेशी विद्यार्थी शिक्षणासाठी भारतामध्ये आले असून त्यापैकी ९०० विद्यार्थी पुण्यामध्ये शिक्षण घेत आहेत. याखेरीज या शिष्यवृत्तीचा लाभ न होऊ शकलेले दीड हजार विद्यार्थी स्वखर्चाने पुण्यामध्ये शिक्षण घेत आहेत.
परदेशातून शिक्षणासाठी भारतामध्ये येऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘आयसीसीआर’मार्फत शिष्यवृत्ती दिली जाते. याअंतर्गत जगभराच्या ४२ देशांतील  तीन हजार विद्यार्थी या शिष्यवृत्तीचे लाभधारक ठरले आहेत. त्यापैकी ९०० विद्यार्थी पुण्यामध्ये शिक्षण घेत आहेत. यामध्ये आशियाई देशातील विद्यार्थ्यांचे प्रमाण ७० टक्के आहे. यंदाच्या वर्षी अफगाणिस्तानमधील विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. त्याचबरोबरीने आखाती देशांसह, ऑस्ट्रेलिया, जर्मनी या देशातील विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. विविध देशांतील भारतीय दूतावासामध्ये शिक्षणासाठी भारतामध्ये येऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रवेश परीक्षा घेतली जाते. यामध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड करून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयामार्फत हे विद्यार्थी भारतामध्ये येतात. यामध्ये पारंपरिक शिक्षणाबरोबरच संगीत, नृत्य, योगा, आयुर्वेद या विषयांचा अभ्यास करण्याकडे कल असतो, अशी माहिती ‘आयसीसीआर’चे उपाध्यक्ष डॉ. एस. एन. पठाण यांनी शुक्रवारी ही माहिती दिली.
परदेशी विद्यार्थी सार्क देशांमधील असेल तर, त्याच्या शैक्षणिक शुल्काच्या तीनपट आणि विद्यार्थी सार्क देशांबाहेरील असेल तर, शैक्षणिक शुल्काच्या पाचपट शुल्क हे तो शिक्षण घेत असलेल्या संस्थेमध्ये भरले जाते. याशिवाय दरमहा साडेपाच हजार रुपयांची शिष्यवृत्ती आणि निवासखर्चापोटी साडेचार हजार असे प्रत्येक विद्यार्थ्यांमागे दरमहा दहा हजार रुपयांची गुंतवणूक केली जाते. विद्यार्थ्यांला वर्षांतून एकदा पुस्तकांच्या खरेदीसाठी पाच हजार रुपये दिले जातात. याखेरीज ‘आयसीसीआर’च्या शिष्यवृत्तीचा लाभ न मिळालेले परंतु स्वखर्चाने शिक्षण घेऊ इच्छिणारे विद्यार्थी संबंधित विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थी केंद्रामार्फत भारतामध्ये येतात, असेही डॉ. पठाण यांनी सांगितले.
 
पुण्यामध्ये सांस्कृतिक केंद्र
कोलकाता येथील रवींद्रनाथ टागोर भवनच्या धर्तीवर ‘आयसीसीआर’चे पुण्यामध्ये सांस्कृतिक केंद्र असावे, अशी मागणी आपण ‘आयसीसीआर’चे अध्यक्ष डॉ. करणसिंग यांच्याकडे केली आहे. कोलकाता येथे तीन एकर जागेमध्ये रवींद्रनाथ टागोर भवन साकारण्यात आले आहे. यामध्ये दोन सभागृह, अतिथिगृह आणि दोन कलादालनांचा अंतर्भाव आहे. त्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री असताना प्रणव मुखर्जी यांनी भरीव आर्थिक तरतूद केली होती. असेच आणखी एक केंद्र पुण्यामध्ये असावे आणि त्यासाठी ‘आयसीसीआर’ने प्राथमिक तरतूद करावी, असे डॉ. करणसिंग यांना सुचविण्यात आले आहे. एकदा संस्थेची तरतूद झाली म्हणजे केंद्रीय अर्थ सचिवांमार्फत केंद्र सरकारकडे अर्थसाह्य़ासाठी प्रयत्न करणे सोईचे होईल, असेही डॉ. एस. एन. पठाण यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Foreign students prefers pune for education