पुणे : माझे सगळे आयुष्य विदर्भाच्या जंगलांमध्ये गेले. जंगलात फिरताना पक्ष्यांची निरीक्षणे करून टिपून ठेवायचो. आदिवासींनी मला त्यांची भाषा शिकविली. त्या भाषेच्या माध्यमातून आपल्याला माहीत नसलेल्या जंगलातील अनेक गोष्टी कळल्या. त्यानंतर पक्षिकोश आणि प्राणिकोशाची निर्मिती केली. आता वयाच्या नव्वदीमध्ये वृक्षकोश निर्मितीचे काम सुरू असल्याचे अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांनी सांगितले. 

पुणे प्रार्थना समाजाच्या १५१ व्या वर्धापनदिनानिमित्त निवृत्त पोलीस महासंचालक जयंत उमराणीकर यांच्या हस्ते चितमपल्ली यांना डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याप्रसंगी चितमपल्ली बोलत होते. सामाजिक कार्यकर्ते डॉ. मििलद भोई यांना महर्षी विठ्ठल रामजी िशदे पुरस्कार आणि पुना ब्लाइंड मेन्स असोसिएशन या संस्थेला डेव्हिडा रॉबर्ट्स पुरस्काराने गौरविण्यात आले. पुना ब्लाइंड मेन्स असोसिएशनचे राजेश शहा, पुणे प्रार्थना समाजाच्या अध्यक्षा डॉ. सुषमा जोग, चिटणीस डॉ. दिलीप जोग उपस्थित होते.

चितमपल्ली म्हणाले, चकोर पक्षाची माहिती संस्कृत साहित्यात मिळते. चकोर आपल्या पिल्लांना घेऊन चंद्र प्रकाशात येते आणि चंद्रप्रकाश वेचते असे म्हटले जाते. यामागील तथ्य जाणून घेण्यासाठी सिमल्याला जाऊन मी पाहणी केली. तर, चकोर पक्षी तिच्या पिल्लांना चंद्रप्रकाशात नेऊन तेथील वाळवी खातात. त्यामुळे त्यांची वाढ लवकर होते आणि शत्रूंपासून संरक्षण करता येते, हे तथ्य आढळून आले.

सुरेल गाणाऱ्या गायिकेला गानकोकिळा म्हटले जाते, परंतु, नर कोकीळ गात असतो मादी कोकिळा कधीच गात नाही त्यामुळे गानकोकिळा म्हणणे योग्य नाही.

मारुती चितमपल्ली, ज्येष्ठ साहित्यिक