बिबट्या बावधनमधील संगोपन केंद्रात

पुणे : हडपसरमधील गोसावी वस्तीत  एकावर हल्ला करणाऱ्या बिबट्याला सतरा तासांच्या शोधमोहिमेनंतर मंगळवारी रात्री पकडण्यात आले. वनविभाग, अग्निशमन दल, पोलीस, इंडियन हार्पेटलॉजिकल सोसायटी, वन्यजीव संरक्षकांच्या प्रयत्नानंतर बिबट्याला पकडण्यात आले. बिबट्याची बावधन येथील रेस्क्यु संस्थेत ठेवण्यात आले आहे. 

हडपसर परिसरातील सीरम इन्स्टिट्यूटजवळ गावदेवी मंदिर परिसरात मंगळवारी (२६ ऑक्टोबर) सकाळी फिरायला गेलेल्या एकावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली. दाट वस्तीत बिबट्याचा वावर असल्याचे आढळून आल्यानंतर परिसरात घबराट उडाली. नागरिकांनी या घटनेची माहिती वनविभागाला दिल्यानंतर बिबट्याला पकडण्यासाठी शोधमोहीम सुरू करण्यात आली. गावदेवी मंदिराजवळील एका पडक्या घरात बिबट्या शिरला होता.

दिवसभर शोधमोहीम राबविण्यात आली. मात्र, बिबट्याचा वावर आढळून आला नव्हता. गावदेवी मंदिरात रात्री नऊच्या सुमारास कलावती नागरे (वय ४५, रा. गोसावी वस्ती, हडपसर) पूजा करत होत्या. त्या वेळी बिबट्याने डरकाळी फोडली. डरकाळीच्या आवाज ऐकल्यानंतर नागरे घाबरल्या आणि  त्या मंदिरातून बाहेर पडल्या. वनविभागाच्या पथकाला या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पुन्हा बिबट्याचा शोध सुरू करण्यात आला. बिबट्या एका पडक्या घरात लपल्याची माहिती मिळाली.

वनविभागाचे पथक, अग्निशमन दलाचे जवान, पोलीस तसेच स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांनी या परिसराची पाहणी केली. रात्री अकराच्या सुमारास बिबट्याचा वावर आढळून आल्यानंतर तेथे लपलेल्या बिबट्याला बंदुकीतून भुलीचे इंजेक्शन (डार्ट) मारण्यात आले. इंजेक्शन लागल्यानंतर काही वेळानंतर बिबट्या बेशुद्ध पडला. त्यानंतर सतर्कता बाळगून बिबट्याला जाळीत ठेवण्यात आले. बिबट्याला बावधन येथील रेस्क्यु संस्थेच्या संगोपन केंद्रात दाखल करण्यात आले.

हडपसरमधील गोसावी वस्तीत बिबट्या शिरल्यानंतर वनविभागासह सर्व पथकांनी केलेल्या प्रयत्नांमुळे  चोवीस तासांच्या आत बिबट्याला पकडण्यात यश आले. त्यासाठी सर्वांचे प्रयत्न महत्त्वाचे ठरले.   – राहुल पाटील, उपवनसंरक्षक, वनविभाग, पुणे</strong>