निमंत्रण न पाठवल्याने महामंडळाच्या वृत्तीचा लेखकाकडून निषेध

पुणे : ‘सरस्वती सन्मान’प्राप्त लेखक शरणकुमार लिंबाळे यांचा साहित्य संमेलनाला विसर पडला असून या लेखकाला संमेलनाचे साधे निमंत्रणही देण्याचे सौजन्य दाखविण्यात आलेले नाही. त्यामुळे साहित्य संमेलन ही प्रस्थापितांची मक्तेदारी आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला असून साहित्य महामंडळ आणि आयोजक संस्थेच्या या कूपमंडूक वृत्तीचा मी निषेध करतो, अशी संतप्त भावना शरणकुमार लिंबाळे यांनी व्यक्त केली. साहित्य संमेलन हे सूड उगविण्याचे ठिकाण असता कामा नये, अशी माझी अपेक्षा आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

नाशिक येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये सरस्वती सन्मानप्राप्त साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांचा सन्मान होईल, अशी मराठी साहित्यप्रेमींची अपेक्षा होती. मात्र, या लेखकाला साधे निमंत्रणही देण्यात आलेले नाही, ही बाब समोर आली आहे.

संमेलनामध्ये माझा म्हणजे लिंबाळेचा सत्कार केला पाहिजे, असा माझा आग्रह नाही. राष्ट्रीय सन्मान प्राप्त झालेल्या लेखकाचा सत्कार साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून होणार नसेल तर तो पानाच्या ठेल्यावर होणार का?  असा सवाल लिंबाळे यांनी केला आहे. समता परिषदेच्या माध्यमातून फुले-शाहू आंबेडकरांचा विचार मांडणारे छगन भुजबळ यांच्याकडून  ४० वर्षे आंबेडकरी चळवळीसाठी लेखन करणाऱ्या साहित्यिकाकडे दुर्लक्ष होत असेल तर ही अपेक्षा कोणाकरून करायची? अशी व्यथा त्यांनी मांडली.

लिंबाळे म्हणाले, राज्य शासनाकडून मिळणाऱ्या ५० लाख रुपयांच्या अनुदानावर साहित्य संमेलन होते. संमेलन ही काही तुमची खासगी मालमत्ता नाही. संमेलन हा लोकांचा उत्सव झाला पाहिजे. गेली अनेक वर्षे संमेलनाच्या आयोजनावर टीका होत असताना महामंडळाला त्याचा विचार करावासे वाटत नाही का? आयोजकांना मराठी साहित्याविषयी आस्था आहे का? मिरवण्यासाठी साहित्य संमेलन आहे का हेच मला समजत नाही. लेखकांवर जातीचा-विचारांचा शिक्का मारणार असाल तर असा दुराग्रह योग्य नाही. स्वातंर्त्यवीर सावरकर असते तर त्यांना साहित्यिक म्हणून महामंडळाने संमेलनाचे निमंत्रण दिले नसते. विशिष्ट गटांनी साहित्य संस्थांवर कब्जा केला असून तेच कोणाला बोलवायचे हे ठरवितात. या कूपमंडूक वृत्तीचा मी निषेध करतो. सर्व विचारांच्या लेखकांना निमंत्रित करायला हवे.   

उस्मानाबाद येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्या पत्नी आणि साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कवयित्री अनुराधा पाटील यांचा सन्मान करण्यात आला होता.

‘शरम कशी वाटत नाही?’

यापूर्वी सरस्वती सन्मान प्राप्त झालेल्या विजय तेंडुलकर आणि महेश एलकुंचवार या लेखकांचा सत्कार केला नाही, असे म्हणताना साहित्य महामंडळाच्या अध्यक्षांना शरम कशी वाटत नाही? ही  काही स्वाभिमानाने सांगण्याची गोष्ट नाही. करत नाही असे म्हणणे हा उद्धटपणा आहे, अशा शब्दांत शरणकुमार लिंबाळे यांनी टीका केली. साहित्य महामंडळ अशा पद्धतीने काम करणार असेल तर ते मराठी माणसांचे प्रतिनिधित्व करत नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

राष्ट्रीय पातळीवरचा सरस्वती सन्मान मिळालेल्या शरणकुमार लिंबाळे यांना साहित्य संमेलनाचे केवळ निमंत्रण न देता संमेलनाच्या व्यासपीठावरून त्यांचा विशेष सन्मान करायला हवा. हे काम संयोजकांनी केले पाहिजे.

प्रा. मिलिंद जोशी, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद आणि सदस्य, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ