पुणे : ‘माझे स्वागत करण्यासाठी आलेल्या व्यक्तीने ‘कोट विसरलात का सर?’, असे विचारले. तेव्हा ‘ते जीवन आता मागे पडले,’ असे मी त्यांना सांगितले’, असे माजी सरन्यायाधीश डाॅ. धनंजय चंद्रचूड यांनी शनिवारी सांगितले. ‘हा मित्राच्या गौरवार्थ कार्यक्रम आहे. अशा प्रसंगी चेहऱ्यावर किंवा अंगावर मुखवटा हवा कशाला?,’ अशी टिप्पणी त्यांनी केली. ‘सत्ता असताना अवतीभवती लोक घुटमळतात. सत्ता गेल्यावर काही उभारलेली इमारत उद्ध्वस्त करू पाहतात. तर, काही तुम्हाला अदृश्य समजतात. मात्र, सुरेश पाकळे यांनी ४० वर्षांची मैत्री कायम जपली. त्यांच्यामुळे माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला,’ असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
टीचर्स असोसिएशन फॉर नॉन एडेड पॉलिटेक्निक्स (टॅफ-नॅप) संघटनेतर्फे डाॅ. धनंजय चंद्रदूड यांच्या हस्ते ज्येष्ठ विधीज्ञ सुरेश पाकळे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याप्रसंगी चंद्रचूड बोलत होते. लोणावळ्यातील कैवल्यधामचे मानद सचिव व कार्यकारी अधिकारी सुबोध तिवारी अध्यक्षस्थानी होते. अरुणा पाकळे, संघटनेचे अध्यक्ष प्रा. राजेंद्र ढवळे, सचिव प्रा. श्रीधर वैद्य या वेळी उपस्थित होते. कार्यक्रमात पाकळे यांच्या जीवन कार्यावर आधारित ‘न्याय सेतू’ या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.
चंद्रचूड म्हणाले, ‘पैशाला आपले सर्वस्व न मानता पीडित शिक्षक, कामगार, फेरीवाले यांना न्याय मिळवून देण्याचे कार्य ॲड. सुरेश पाकळे यांनी केले. सरस्वतीची आराधना करत ते मूक व्यक्तींचा आवाज, पीडित नागरिकांचे आधारस्तंभ बनले. त्यांच्या कार्यात परिवर्तनाची शक्ती आहे. कधी आम्ही एकत्र काम केले. तर, कधी वकील म्हणून न्यायालयात एकमेकांविरूद्ध युक्तिवाद केला. जिंकणे-हरणे प्रत्येकाच्या हाती नसते. पैसे हवे असते तर वकिलीत कशाला आलो असतो? कुठे तरी दुकान उघडले असते.’
पाकळे म्हणाले, ‘गेली ४० वर्षे न्यायालय हेच कार्यक्षेत्र आणि मंदिर मानले. वकिली हा व्यवसाय नसू ती सामाजिक जबाबदारी आहे. आपण खटल्याचा फक्त युक्तिवाद करत नसून मानवी प्रतिष्ठेचे रक्षण करीत आहोत या भूमिकेतून सत्तेपेक्षा गरजू समाजासाठी उभा राहिलो, यात समाधान आहे. लाखो लोकांचे प्रश्न न्यायालयासमोर मांडता आले. विवेक जागत होतो आणि कायद्याचे राज्य प्रस्थापित होते. हा कायद्याचा गौरव चिरायू हावो.’ वैद्य यांनी प्रास्ताविकात सुरेश पाकळे यांच्या कार्याची ओळख करून दिली. माजी सरन्यायाधीश भूषण गवई, ज्येष्ठ विधिज्ञ वीरेंद्र सराफ यांच्या शुभेच्छा संदेशाचे वाचन अस्मिता कुलकर्णी यांनी केले. माधुरी कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.
