कोंढवा येथील महापालिकेच्या बहुउद्देशीय सभागृहावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी नगरसेवक, शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी बेकायदा कब्जा केला आहे, अशी तक्रार आम आदमी पक्षाने महापालिकेकडे केली आहे. प्रशासनाला कोणतीही कल्पना न देता साईनाथ बाबर यांनी नाममात्र शुल्कात तिसऱ्याच व्यक्तीला हे सभागृह भाडेतत्वावर दिले आहे, असे या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, महापालिका आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांनी सभागृह सील करण्याचे आदेश दिले आहेत.
यासंदर्भात आपच्या कार्यकर्त्यांनी कोंढवा पोलिसांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये बाबर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

पुणेकरांच्या मालमत्तेवर लोकप्रतिनिधींनी अतिक्रमण करणे हा गंभीर प्रकार आहे. साईनाथ बाबर तसेच त्यांना सहकार्य करणाऱ्या सर्वांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. आपचे वानवडी विभाग समन्वयक विद्यानंद नायक, आप कोंढवा विबाग समन्यवक साजिद खान, ॲड. मनोज माने यांच्या शिष्टमंडळाने ही मागणी केली आहे.