पुणे : मैत्री संबंधातून काढलेली छायाचित्रे समाजमाध्यमात प्रसारित करण्याची धमकी देऊन एका माजी नगरसेविकेवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पर्वती पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.सचिन मच्छिंद्र काकडे (वय ४३, रा. संतोषनगर, कात्रज) असे गु्न्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत एका नगरसेविकेने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी काकडे आणि पीडित नगरसेविकेचे मैत्री संबंध होते. समाजमाध्यमात छायाचित्रे, ध्वनिचित्रफीत प्रसारित करण्याची धमकी काकडे याने तिला दिली. त्यानंतर त्याने धमकावून नगरसेविकेवर वेळोवेळी बलात्कार केला. सन २०१७ पासून नगरसेविकेला धमकावून काकडे याने अत्याचार केले होते. नगरसेविकेला धमकावून वेळोवेळी दहा लाख रुपये उकळले. त्यानंतर काकडे नगरसेविकेला धमकावत होता. पतीला मैत्रीसंबंधाबाबत माहिती देतो, असे सांगून तिच्याकडून आणखी पैशांची मागणी केली. दोन दिवसांपूर्वी काकडे तिच्या घरी आला. तू दुसरा विवाह केला आहे. तुझ्यामुळे माझी पत्नी सोडून गेली आहे, असे सांगून त्याने तिला मारहाण केली. अखेर काकडेच्या त्रासाला कंटाळून तिने पर्वती पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीस उपनिरीक्षक सचिन निकाळजे तपास करत आहेत.