शिरूर लोकसभा मतदारसंघावरून राष्ट्रवादीत घमासान सुरू आहे. ही जागा अमोल कोल्हेंनाच मिळणार असल्याचे जवळपास निश्चित झालेले असताना राष्ट्रावादीचे माजी आमदार विलास लांडे यांनी पुन्हा या जागेसाठी इच्छा व्यक्त केली आहे. दरम्यान, आज टीव्ही ९ मराठीला दिलेल्या मुलाखतीतही त्यांनी त्यांची इच्छा बोलून दाखवली. त्यामुळे शरद पवारांच्या मध्यस्थीनंतरही शिरूर लोकसभा मतदारसंघाचा तिढा अद्यापही सुटलेला दिसत नाहीय. शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे खासदार आहेत. २०१९ च्या निवडणुकीत त्यांनी मुसंडी मारत हा मतदारसंघ आपल्या ताब्यात घेतला. आता आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधीच अमोल कोल्हेंच्या भाजपासोबत गाठीभेटी वाढल्याने ते भाजपाच्या वाटेवर असल्याचं बोललं जातंय. त्यामुळे माजी आमदार विलास लांडे या जागेवरून निवडणूक लढवण्यास इच्छूक आहेत. परंतु, आपण भाजपासोबत जाणार नसल्याचं अमोल कोल्हे यांनी जाहीर केल्यानंतर शिरूरमधील तिढा जवळपास संपला होता. शिरूर लोकसभा मतदारसंघाची जागा अमोल कोल्हेंनाच? दरम्यान, काल (५ जून) राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीतील चर्चेनुसार शिरूरच्या जागेवरून अमोल कोल्हे यांनाच तिकिट देण्यात येणार आहे. याबाबत खुद्द शरद पवार यांनीच मध्यस्थी केले असल्याचं म्हटलं जातंय. परंतु, तरीही माजी आमदार विलास लांडे या जागेवरून इच्छूक आहेत. काय म्हणाले विलास लांडे? विलास लांडे म्हणाले की, "शरद पवारांचे विचार राज्यात आणि देशात नेणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. अनेक कामं पूर्ण होण्याकरता पवारांनी काम करण्याची संधी दिली तर काम करायला आवडेल. विरोध होऊन काम करणार नाही. अमोल कोल्हे एक चांगला अभिनेता आहे. तो अभिनेता संभाजी महाराजांची भूमिका पार पाडणारा आहे. त्यामुळे एक आदर्श डोळ्यांसमोर ठेवला आहे. परंतु, पवार साहेबांनी दुसरीकडे कुठेही संधी दिली तरीही काम करायला तयार आहे. संधी नाही दिली तरी काम करणार आहे", असं विलास लांडे म्हणाले.