पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिरुरचे शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील सोमवारी एकत्र प्रवास केल्याने आढळराव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. शिरूरमधून आढळराव पाटील यांना उमेदवारी मिळणार की जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, भाजपचे नेते प्रदीप कंद हे उमेदवार असणार याबाबतही चर्चा सुरू झाली आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकीत आढळराव यांचा विद्यमान खासदार डाॅ. अमोल कोल्हे यांनी पराभव केला होता. शिवसेनेतील फुटीनंतर आढळराव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला. त्यामुळे आढळराव पाटील आणि कोल्हे यांच्या लढत होईल, अशी चर्चा असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर राजकीय समीकरणे बदलली. अजित पवार यांनीही शिरूर लोकसभेची जागा निवडून आणण्याचा चंग बांधल्याने त्यांचा उमेदवार कोण असेल, अशी चर्चा सुरू झाली असतानाच आढळराव यांना म्हाडाचे अध्यक्षपद देण्यात आले. महायुतीच्या उमेदवाराला मताधिक्याने निवडून आणले जाईल, असे आढळराव यांनी सांगितले होते. मात्र त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांच्या प्रवेशाची चर्चा काही दिवसांपासून सुरू झाली होती. या चर्चेला त्यांनी अजित पवार यांच्यासमवेत मोटारीतून केलेल्या प्रवासामुळे अधिक जोर मिळाला आहे.

हेही वाचा – पिंपरी : पाणीपट्टी थकबाकीदारांच्या तोंडचे पाणी पळणार; महापालिकेने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

हेही वाचा – पुणे शहरात आजपासून जड वाहनांना प्रवेश बंद, पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन

आंबेगाव तालुक्यातील विविध विकासकामांचे उद्घाटन सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आढळराव हे पवार यांच्या स्वागतासाठी हजर होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने या दोघांनी मोटारीने एकत्रित प्रवास केला. त्यामुळे राजकीय चर्चा सुरू झाली असून आढळराव यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेश निश्चित असल्याचे बोलले जात आहे.