पुणे : माजी महापौर आणि रक्तदान क्षेत्रातील ज्येष्ठ कार्यकर्ते शांतिलाल सुरतवाला (वय ७६ ) यांचे शुक्रवारी पहाटे कर्करोगाने निधन झाले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे कट्टर समर्थक असलेले सुरतवाला राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष होते. सार्वजनिक काका अशी त्यांची ओळख होती.
शिवसैनिक म्हणून सामाजिक काम सुरू करणाऱ्या सुरतवाला यांनी सिटी पोस्ट वॉर्डातून १९७९ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवून नगरसेवक झाले आणि त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. २००९ पर्यंत नगरसेवक असलेल्या सुरतवाला यांनी महापौरपद भूषविले होते. शरद पवार यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते असलेले सुरतवाला राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष होते. सकारात्मक राजकारण करणारा, नाविन्यपूर्ण कल्पनांचा स्रोत असलेल्या सुरतवाला यांनी राजकारणातून बाजूला होत रक्तदानाच्या पवित्र कार्याला झोकून दिले. हौस म्हणून रंगमंचावर वावरणारा त्यांच्यातील कलावंत पुणेकरांनी पहिला आहे.
महापालिकेत काम करताना सुरतवाला यांनी नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली. गिरीश बापट आणि अंकुश काकडे यांच्या साथीने त्यांनी काही उपक्रम राबविले. या त्रिकुटाला ‘गॅस’ या नावाने संबोधले जात होते. राजकारणातून बाजूला झाल्यानंतर त्यांनी रक्तदानाच्या कार्यक्रमाला वाहून घेतलं. रक्तपेढी काढली.
महापौर असतानाच्या काळात केलेल्या उपक्रमाचं एक पुस्तक त्यांनी काही महिन्यांपूर्वी प्रकाशित केले होते. अलीकडे त्यांनी राजकीय टिपण्णी करणारे व्हिडिओ समाजमाध्यमावर प्रसारित केले होते. भ्रमंती हा त्यांचा आवडता विषय होता. सह्याद्रीच्या कड्या कोपऱ्यात आणि हिमालयाच्या विहंगम परिसरात ते गिर्यारोहण करत असत. त्यासाठी ते पर्वती चढण्याचा व्यायाम करून ते स्वतःला तंदुरुस्त ठेवत. कर्करोग झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतरही ते खचले नाहीत. त्याचा त्यांनी सामना केला होता. सारे काही पूर्ववत सुरू असतानाच त्यांचे पहाटे निधन झाले.
स्वतःहून कधीही पदाची अपेक्षा न करणाऱ्या सुरतवाला यांना शरद पवार यांनी स्वतःहून महापौरपदाची जबाबदारी दिली होती. ते प्रसिद्ध आनंद ऋषीजी ब्लड बँकचे संस्थापक होते. गणेश मंडळाचे कार्यकर्ते म्हणूनही त्यांचा शहरात मोठा दबदबा होता. महापौर असताना शहरातील रस्ते धुण्याची योजना त्यांनी मांडली होती. शहरातील प्रमुख १२ रस्ते कात्रज तलावाच्या पाण्याने धुण्याची आणि त्याद्वारे प्रदूषण कमी करण्याची त्यांची योजना होती. महापौरपदाच्या काळात आयुक्त असलेले अजित वर्टी यांच्यासोबत त्यांनी एका चित्रपटात तसेच ‘सौजन्याची ऐशी तैशी’ या नाटकातही सुरतवाला यांनी काम केले होते.

