पुणे : ‘राज्य शासनाकडून विरोधी विचारांच्या लोकांवर शहरी नक्षली असल्याचे शिक्के मारले जात असून त्यांच्या कामांचा प्रभाव नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यापूर्वीही चांगले काम करणाऱ्या अनेकांना नक्षली ठरवून तुरुंगात टाकण्यात आले. मात्र न्यायालयाचा निकाल त्यांच्याबाजूने अनुकूल आला. त्यामुळे यासंदर्भात जनमत करावे लागेल,’ अशी प्रतिक्रिया माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी येथे गुरूवारी दिली.

पालखी सोहळ्यात शहरी नक्षलवादी सहभागी होत असल्याचा आरोप शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी केला आहे. पवार यांनी मोदीबाग या त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी कायंदे यांच्या आरोपासंदर्भात त्यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

‘पालखी सोहळ्यात शहरी नक्षलवादी सहभागी झाल्यासंदर्भात दोन संस्थांची नावे पुढे आली आहेत. त्यातील एक लोकायत ही संस्था आहे. या संस्थेकडून अनेक चांगली कामे केली जात आहेत. ही संस्था नक्षली नाही. श्यामसुंदर सोन्नर हे अनेक वर्षांपासून चांगले काम करत आहेत. चांगले काम करणाऱ्या आणि विरोधी विचारांच्या लोकांवर शहरी नक्षलींचे शिक्के मारण्याचा प्रयत्न राज्य शासनाकडून होत आहेत,’ असे पवार यांनी सांगितले.

राज्यातील प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध आहे. त्यामुळे या मार्गाची आवश्यकता आहे का, असे विचारले असता पवार म्हणाले, ‘राज्यातील अनेक ठिकाणी जाण्यासाठी चांगले रस्ते आहेत. केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांनी चांगले रस्ते केले आहेत. या परिस्थितीत एक चांगला रस्ता असताना दुसरा रस्ता कशासाठी हा प्रश्न आहे. शक्तीपीठ महामार्गाची आवश्यकता आहे, असे मुख्यमंत्री सांगत आहेत. तर या रस्त्याची आवश्यकता का आहे, हे मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून समजून घेतले जाईल. शक्तीपीठाची आवश्यकता असेल तर त्याला पाठिंबा दिला जाईल. अन्यथा राजू शेट्टी यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला समर्थन दिले जाईल.’

शिवसेना-मनसेच्या विजयी मेळाव्यात राष्ट्रवादीचा सहभाग

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हिंदी सक्तीबाबतचा आदेश रद्द केल्यानंतर शिवेसना (ठाकरे) आणि मनसेचा येत्या शनिवारी (५ जुलै) मुंबईतील वरळी येथे विजयी मेळावा होणार आहे. या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी होण्यासंदर्भातही शरद पवार यांनी भूमिका मांडली. ‘यासंदर्भात पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी भूमिका जाहीर केली आहे. हिंदी सक्तीविरोधातील आंदोलना पक्षाने पाठिंबा दिला होता. सहभागासंदर्भात त्यांनी भूमिका जाहीर केली आहे. प्रदेशाध्यक्षांचा आदेश मी मानतो. मात्र पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे मी या मेळाव्यात सहभागी होणार नाही,’ असे पवार यांनी स्पष्ट केले.