विसर्जनाच्या दिवशी शहराच्या वेगवेगळ्या भागात किरकोळ वादातून मारहाण करण्यात आल्याच्या घटना घडल्या. या प्रकरणी वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात चार गुन्हे दाखल असून लोहियानगर, कासेवाडी, रास्ता पेठ, ओैंध परिसरात या घटना घडल्या.साहिल अंबादास भोंगे (वय २०, रा. कासेवाडी, भवानी पेठ) याने याबाबत खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार देवा संजय कांबळे, नजीर वसीम शेख, आसिफ बाबुलल शेख (वय २२, रा. कासेवाडी, भवानी पेठ), अदनान यांच्या विरोधात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी शेख यांना अटक करण्यात आली आहे. साहिल याची आरोपींबरोबर पाच महिन्यांपूर्वी भांडणे झाली होती. विसर्जन मिरवणूक पाहून तो घरी जात होता. त्या वेळी आरोपी कांबळे, शेख यांनी त्याला अडवले. त्याला धमकावून जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपींनी साहिलच्या चेहऱ्यावर कुऱ्हाडीने वार केला. त्यानंतर त्याच्या डोक्यात दगड मारुन आरोपी पसार झाले. सहायक पोलीस निरीक्षक नितीनुकुमार नाईक तपास करत आहेत.

हेही वाचा >>> पुणे : लोहगाव विमानतळावर तस्करीची ६१ लाख रुपयांची सोन्याची बिस्किटे जप्त

महात्मा फुले पेठेतील लोहियानगर भागात विसर्जन मिरवणुकीत नाचत असताना किरकोळ वादातून स्वप्नील सतीश साळुंके (वय २५, रा.लोहियानगर) याच्यावर कोयत्याने वार करण्यात आला. या प्रकरणी अंकुश विठ्ठल कांबळे (वय २२, रा. लोहियानगर) याला अटक करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक सूरज कुतवळ तपास करत आहेत.रास्ता पेठेतील प्रताप मित्र मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत झालेल्या वादातून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. राहुल दिगंबर कुंजीर (वय २९, रा. गणेश पेठ, दूध भट्टीजवळ) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. राहुलने याबाबत समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी विराज आम्रे, किरण शिवरकर, यश वालिया (रा. रास्ता पेठ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. कुंजीर याचा मित्र देवेंद्र दत्तुर याला आरोपी आम्रे मारहाण करत होता. त्या वेळी राहुल भांडणे सोडविण्यासाठी गेला. आरोपींनी राहुलला बेदम मारहाण केली. या घटनेत तो जखमी झाला. पोलीस उपनिरीक्षक मीरा त्र्यंबके तपास करत आहेत.

हेही वाचा >>> पुणे : दहशत माजविणाऱ्या गुंड टोळीच्या विरोधात मोक्का कारवाई

ओैंधमधील इंदिरा वसाहतीत विसर्जन मिरवणुकीत धक्का लागल्याने झालेल्या वादातून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. बाजीराव विजय मोरे (वय २७, रा. इंदिरा वसाहत, गणेशखिंड रस्ता, ओैंध) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. मोरे याने याबाबत चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मोरे आणि त्याचे मित्र वसाहतीतील विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी निघाले होते. त्या वेळी धक्का लागल्याने प्रेम वाधमारे, अनिकेत पवार, शुभम गायकवाड, नयन लोंढे, अमित साबळे, आदित्य वाघमारे, मयूर लोंढे, रोहन वाघमारे आणि साथीदारांनी मोरेला बेदम मारहाण केली. दगडफेक करुन परिसरात दहशत माजविली. आरोपी शुभम गायकवाड सराईत असून त्याला अटक करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक महाडीक तपास करत आहेत.