एनडीए चौकातील (चांदणी चौक) अतिरिक्त दोन मार्गिकांची कामे चालू आठवड्यात पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे वाहतुककोंडी टाळण्यासाठी आनंदऋषीजी चौकातील (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील) उड्डाणपूलाचे काम सुरू करण्याचा निर्णय महापालिका आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पुणे मेट्रोपोलिटन रिजन डेव्हलपमेंट ॲथॉरिटी – पीएमआरडीए) घेतला आहे. परिणामी या पूलाच्या कामाला आणखी चार दिवस विलंब होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शुक्रवारी (७ ऑक्टोबर) महापालिका, पीएमआरडीए आणि वाहतूक पोलीस यांची एकत्रित बैठक होणार आहे.
विद्यापीठ चौकात उड्डाणपूलाचे काम सुरू करण्याचे सर्व नियोजन पीएमआरडीएकडून पूर्ण करण्यात आले आहे. चांदणी चौकात पूल पाडण्याचे काम पूर्ण झाले असून अतिरिक्त दोन मार्गिकांचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, ते पूर्ण होण्यास अद्याप काही दिवस लागणार आहे. याच कालवधीत विद्यापीठ चौकात पूलाचे काम सुरू केल्यास दोन्ही ठिकाणी वाहतूकीची कोंडी होऊन नागरिकांना त्रास होऊ शकतो. या सर्व गोष्टींचा विचार केला, तर काम सुरू केल्यानंतर नागरिकांची गैरसोय होऊ शकते. त्यामुळे ६ ऑक्टोबरऐवजी हे काम १० ऑक्टोबरपासून सुरू करावे, अशी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सूचना केली आहे. तसे केल्यास एनडीए चौकातील अतिरिक्त दोन मार्गिकांचे काम पूर्ण होऊन तेथील वाहतूक सुरळीत होईल आणि विद्यापीठ चौकावरही ताण कमी होईल, अशी माहिती पीएमआरडीएचे मुख्य अभियंता विवेक खरवडकर यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> मनोबल वाढवा, शौर्याची परंपरा राखा ; पिंपरी पोलीस आयुक्तांचे आवाहन

दरम्यान, याबाबत निर्णय घेण्यासाठी शुक्रवारी महापालिका आयुक्त, पीएमआरडीए आणि वाहतूक पोलीस यांची एकत्रित बैठक बोलविण्यात आली आहे. हे बैठक सकाळी साडेदहा वाजता होणार असून त्यामध्ये चौकात उड्डाणपूलाचे काम कधी सुरू करावे, यावर एकमत करून निर्णय घेण्यात येणार आहे, असेही खरवडकर यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा >>> पिंपरी : सोसायट्यांच्या समस्यांवरून भाजप-राष्ट्रवादीचे ‘मतांचे राजकारण’ ; अजित पवार यांच्या उपस्थितीत आज सोसायट्यांचा मेळावा

म्हणून हा निर्णय एनडीए चौकातील उड्डाणपूल रविवारी पहाटे पाडण्याचा आणि तो पडल्यानंतर पुढील आठ दिवसात अतिरिक्त दोन मार्गिकांची कामे पूर्ण करण्याचे नियोजित होते. तसेच विद्यापीठ चौकात दुमजली उड्डाणपूल उभारण्याचे काम ६ ऑक्टोंबरला सुरू करण्याचा निर्णय पुणे महानगर परिवहन प्राधिकरणाच्या (पुणे युनिफाइड मेट्रोपोलिटन ट्रान्सपोर्ट ॲथॉरिटी – पुम्टा) बैठकीत घेण्यात आला होता. त्यानुसार एनडीए चौकातील पूल पाडण्याचे काम पूर्ण झाले असून राडारोडाही हटविण्यात आला. मात्र, हा पूल पाडल्यानंतरही सोमवारी पुणे-मुंबई महामार्गावर वाहतूकीची कोंडी झाली. त्याच वेळेस विद्यापीठ चौकातही वाहतुकीची कोंडी झाली. चांदणी चौकातील अतिरिक्त दोन मार्गिकांचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र हे काम पूर्ण होण्यास हा आठवडा लागण्याची शक्यता आहे. तोपर्यंत वाहतुक सुरळीत होण्यास वेळ लागणार आहे. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Four days delay in work of flyover at university chowk pune print news amy
First published on: 04-10-2022 at 20:40 IST