हडपसर येथील रामटेकडी परिसरात राहणाऱ्या महिलेचे नवजात अर्भकासह अपहरण करण्याची घटना उघडकीस आली आहे. महिलेचा खून करून पसार झालेल्या चौघांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या तावडीतून पंचवीस दिवसांच्या अर्भकाची सुटका करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेले आरोपी लहान मुलांचे अपहरण करून त्यांची विक्री करणाऱ्या टोळीतील असल्याचा संशय पोलिसांना आहे.
मधू रघुनंदन ठाकूर (वय २२, रा. वैदुवाडी, हडपसर, मूळ रा. उत्तरप्रदेश) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रक रणी निकिता संजय कांगणे (वय ३०), चंद्रभागा कृष्णा उड्डाणशू (वय ३५), लक्ष्मी उर्फ पिंकी बालाजी जाधव (वय १९), आकाश कृष्णा उड्डाणशू (वय १९, सर्व रा. रामटेकडी, हडपसर) यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि ठाकूर हे ओळखीचे आहेत. गर्भवती असलेल्या मधूला दोन महिन्यांपूर्वी आरोपी निकिता भेटली होती. मी अंगणवाडी सेविका आहे. गर्भवती महिलांना शासनाकडून अनुदान देण्यात येते. अनुदान मिळवून देण्यासाठी मी मदत करेल, अशी बतावणी निकिताने मधूकडे केली होती. तिने ठाकूर दांम्पत्याचा विश्वास संपादन केला. त्यानंतर ती त्यांच्या घरीही गेली होती.
मधू प्रसृत झाल्यानंतर निकिता शुक्रवारी (१७ जून) तिच्या घरी गेली. तिच्यासोबत लक्ष्मी जाधव होती. मुलाला पोलिओ डोस देऊ. शासकीय अनुदान मिळवून देते, असे तिने मधूला सांगितले. त्यानंतर मधू नवजात बाळाला घेऊन दोघींसह बाहेर पडली. बराच वेळ झाल्यानंतरही मधू बाळाला घेऊन घरी न आल्याने पती रघुनंदन याने पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्यानुसार हडपसर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तातडीने तपास सुरू केला. पोलिसांनी निकिताचा शोध घेण्यास सुरुवात केली. निकिताला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्यानंतर तिने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसी खाक्या दाखवताच मधूचा गळा दाबून खून केल्याची कबुली पोलिसांना दिली. निकिताच्या घराशेजारी असलेल्या बंद खोलीत मधूचा मृतदेह सापडला. बंद खोलीत पलंगाखाली तिचा मृतदेह चादरीत गुंडाळून ठेवला होता. त्यानंतर पोलिसांनी नवजात अर्भकाबाबत चौकशी केली. तेव्हा लक्ष्मीने नवजात अर्भक हडपसर येथील काळेपडळ परिसरात ठेवल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी निकिता, तिचे साथीदार लक्ष्मी, चंद्रभागा आणि आकाश यांना अटक केली.
पोलिसांनी नवजात अर्भकाला वडील रघुनंदन याच्या ताब्यात दिले आहे. रघुनंदन एका चप्पलविक्रीच्या दुकानात कामाला आहे. मधूचे बाळ आरोपी कोणाला विकणार होते, यादृष्टीने पोलीस तपास करत आहेत. आरोपींनी अशा पद्धतीने आणखी काही गुन्हे केल्याचा संशय आहे, अशी माहिती हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णू पवार यांनी दिली. पोलीस निरीक्षक विष्णू पवार, सहाय्यक निरीक्षक संतोष तासगावकर, सतीश ठोंबरे, गणेश दळवी, माणिक डोके, संतोष जाचक, अनिल कुसाद, विनोद लवांडे, दाऊद सय्यद यांनी ही कारवाई केली.