चालकाचे नियंत्रण सुटून मोटार विरुद्ध दिशेला जात टेम्पोला धडकून झालेल्या अपघातामध्ये वाकडजवळील इंदिरा कॉलेजमध्ये व्यवस्थापन शास्त्राचे ( एमबीए) शिक्षण घेणाऱ्या एका तरुणीसह चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून एक तरुणी जखमी आहे. पुणे-मुंबई महामार्गावर कार्ला लेण्याजवळील एमटीडीसीजवळ रविवारी पहाटे तीनच्या सुमारास हा अपघात झाला.
आदित्य महावीर अगरवाल (वय २३), अंकित कमलेश गर्ग (वय २२, रा, सिरोही, राजस्थान), रोहिदास शशिकांत शुक्ला (वय २३, रा. कानपूर), गरिमा अजयकुमार गोयल (वय २२, रा. चंदिगढ) अशी मृतांची नावे आहेत तर इशिका सिंगराव (वय २२, रा. जयपूर, राजस्थान) ही तरुणी जखमी असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातामधील मयत आणि जखमी वाकडजवळील इंदिरा कॉलेजमधील व्यवस्थापन शास्त्राचे विद्यार्थी आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अगरवाल आणि त्याचे दोन मित्र, दोन मैत्रिणी  रविवारी पहाटे पुण्याहून मुंबईकडे जात होते. जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर कार्ला लेण्याजवळ पहाटे तीन वाजता मोटार कार चालकाचे मोटारीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे मोटार रस्ता दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेला जात मुंबईकडून पुण्याकडे येणाऱ्या टेम्पोला धडकली. या अपघातामध्ये मोटारीतील तिघांचा जागेवरच मृत्यू झाला. तर, अंकितचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जखमी इशिकावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे सर्वजण व्यवस्थापन शाखेच्या पहिल्या वर्षांचे विद्यार्थी आहेत. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी टेम्पो चालकास चौकशीसाठी ताब्यात घेतले असून अधिक तपास पोलीस निरीक्षक संदीप येडे करत आहेत.